Home Artical Blog प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची

प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची

0

महावितरणचे संचालक श्री.राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पुण्यात थाटात उद्घाटन

पुणे(Pune), दि. ६ मे २०२६: सर्व खेळाडूंना एकत्रितपणे, एकजुटीने व सहकार्याने खेळूनच विजयाला गवसणी घालावी लागते. त्यामुळे कोणत्याही संघात सर्वप्रथम संघभावना निर्माण झाली की प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळते. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रामुख्याने विद्युत कंपन्यांमधील खेळाडूंचा सहभाग व नावलौकीक वाढत आहे, ही अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि. ६) केले.

बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या तीन दिवसीय क्रीडास्पर्धेला प्रारंभ झाला. महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. सुनील काकडे, आयोजन समितीचे उपाध्यक्ष व मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप (महापारेषण)व श्री. अशोक घाडगे, मुख्य अभियंता श्री. धनराज पेठकर, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. भूषण कुलकर्णी , मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके (महावितरण) व पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती), विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. जिग्नेश राय, सरचिटणीस श्री. नरेश कुमार, उपाध्यक्ष श्री. भरत पाटील, खजीनदार श्री. ललित गायकवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

विद्युत नियंत्रण मंडळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने देशातील सर्व विद्युत कंपन्यांच्या खेळाडूंचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. सर्व विद्युत कंपन्या आणि त्यांच्या उत्कृष्ट खेळाडूंना देशपातळीवर एकत्र आणण्यासाठी या मंडळाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असे गौरवोद्गार संचालक श्री. पवार यांनी काढले. प्रादेशिक संचालक श्री. सुनील काकडे यांनी सांगितले, की विद्युत क्षेत्र धकाधकीचे आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धेतून कर्मचारी मानसिक व शारीरिकदृष्ट्या कणखर बनतात. यासह त्यांच्या मैदानातील शिस्तीने कार्यालयातील कार्यक्षमतेत देखील वाढ होते.

अत्यंत नेत्रदीपक व उत्साहात झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे खजिनदार श्री. ललित गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटणी, रामगोपाल अहीर, भक्ती जोशी, सोनाली बाविस्कर, स्वागती सोळंकुरे यांनी केले तर श्री. अशोक घाडगे यांनी आभार मानले.

या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, तेलंगाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यांतील सरकारी व खासगी विद्युत कंपन्यांचे ४१ संघ आणि सुमारे ५३८ महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत.

AIESCB Sports Inauguration 06-05-2026 – बालेवाडी ( पुणे) येथे राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉल क्रीडास्पर्धेचे उद्घाटन महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन झाले. यावेळी श्री. सुनील काकडे, श्री. अनिल कोलप, श्री. अशोक घाडगे, श्री. जिग्नेश राय, सरचिटणीस श्री. नरेश कुमार आदींची उपस्थिती होती.