मलिक मुद्यावर भाजप-अजित पवार गटात धुसफूस!

0

नागपूर– NCP  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या महायुतीतील समावेशावरून सुरु झालेल्या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांनी सांगितले की, “नवाब मलिक हे प्रथमच सभागृहात आले आहेत. त्यमुळे त्यांची नेमकी काय भूमिका आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर आपण त्यावर आपले व पक्षाचे मत व्यक्त करणार आहोत. नवाब मलिक यांनी नेमके कोणे बसावे, हा सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. इतर लोक त्यावर काय बोलताहेत याची मला कल्पना नाही”, या शब्दात अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. तर दुसरीकडे अजित पवार गटाचेच अमोल मिटकरी यांनी नवाब मलिक हे आमच्या सोबतच असतील असे सांगत फडणवीस यांच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावरुन महायुतीत सुरु झालेला वाद हा आज दुसऱ्या दिवशीही सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नवाब मलिक मुद्यावर आपला भाजपच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या वादानंतर आजही नवाब मलिक हे विधानसभेत अजित पवार गटासोबत सत्तारुढ बाकावर बसल्याचे दिसून आले. (Winter Assembly Session-2023)
काल सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रानंतर या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधान भवन परिसरात पडले. नवाब मलिक यांनी या मुद्यावर तोंड उघडण्यास नकार दिला व ते अजित पवार गटासह पुन्हा सत्तारुढ बाकावर बसल्याचे दिसून आले. त्यामुळे अजित पवार गटाची नेमकी काय भूमिका आहे, याकडे लक्ष लागले होते. अजित पवार यांनी नवाब मलिक यांची भूमिका जाणूनच या मुद्यावर आपली स्वतःची व पक्षाची भूमिका मांडणार असल्याचे जाहीर केले.

मिटकरींचा विरोध

दुसरीकडे अजित पवार गटाचेच आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीस यांच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली. आम्ही मलिक यांच्यासोबत आहोत, असे मिटकरी यांनी स्पष्ट केल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. मिटकरी म्हणाले, नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत आहे, असे मिटकरी म्हणाले. त्यामुळे या मुद्यावर अजित पवार गट भाजपच्या भूमिकेला आव्हान देणार की काय, याकडेही लक्ष लागलेले आहे