जिल्हाधिकाऱ्यांनी ‘जी-20’ आयोजनाबाबत घेतला आढावा

0

 

नागपूर – पुढील आठवड्यात शहरात होणाऱ्या जी-20 परिषदेबाबत जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांच्या नियोजनाचा आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवनात आयोजित या आढावा बैठकीस जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उप वनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके आदी कोअर कमीटीचे सदस्य व अन्य समित्यांचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जी-20 परिषदेंतर्गत नागपुरात होत असलेल्या जी -20 या जागतिक दर्जाच्या आयोजनासाठी तयार केलेल्या नियोजनानुसार विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन केल्या आहेत. डॉ. इटनकर यांनी बैठकीत समितींकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या व नियोजनाबाबत माहिती घेतली व आवश्यक सूचना दिल्या. प्रशासनाने केलेले नियोजन व त्यादिशेने सुरु असलेल्या अंमलबजावणीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
जी -20 परिषदेसाठी 19 मार्च रोजी सायंकाळपासून परदेशी व भारतीय प्रतिनिधींचे शहरात आगमन होणार आहे. 20 मार्च रोजी दुपारी 3.30 वा. रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सामाजिक तथा अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
नागरी संस्थांची शाश्वत विकासातील भूमिका, जगभरातील स्वयंसेवी संस्थांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय बाबत या परिषदेत चर्चा व मंथन होणार आहे. सलग दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या समारोपास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.