आला उन्हाळा……. आरोग्य सांभाळा

0

 

नागपूर – गेल्या काही दिवसात ढगाळ वातावरण आणि मधूनच कडक ऊन असा विचित्र अनुभव नागपूरकर घेत आहेत. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा पाहता यंदाचा उन्हाळा ‘ लय भारी ‘असण्याची चिन्हे अधिक आहेत. आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय तज्ञांनी देखील या संदर्भात सावधगिरीचा इशारा दिला आहे. उन्हाळा म्हटला की, डोळ्यासमोर येतात ते गारेगार थंडावा देणारी रसवंती,टरबूज, खरबूज, आईसगोला, आईस्क्रीम पार्लर आणि उत्तम आरोग्यासाठी ओल्या नारळाचे पाणी अर्थात शहाळे. सध्या या वस्तूंनी बाजार सजला आहे. मार्च महिना संपायला आलेला असताना घरोघरी कुलर, एसीची घरघर सुरू झालेली दिसण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता कॉटन मार्केट, महात्मा फुले मार्केटमधील कुलर बाजार देखील सज्ज झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खस,वूडवुल विक्रेत्यांची दुकाने सजली आहेत. मात्र, ढगाळ वातावरणाने त्यांची चिंता वाढवली आहे. यावर्षी बंगलोर,हैदराबाद येथून येणाऱ्या ओल्या नारळाला मोठी मागणी असल्याने 40 ते 45 रुपयांना नारळपाणी मिळत आहे. टरबूज,खरबूज किमान 70- 80 रुपये प्रमाणे विक्री सुरू आहे. थंड ताक, लस्सीची दुकानेही सजली आहेत. उसाचा रस अगदी सात रुपयापासून वीस रुपयांपर्यंत मिळत आहे. आईस्क्रीम पार्लरमध्ये रात्रीच्या वेळी गर्दी पाहायला मिळत आहे. गॉगल, डोक्याला बांधायचे दुपट्टे देखील बाजारात आले आहेत. फळांचा राजा आंबा सध्या मोठ्या प्रमाणात यायचा असला तरी एकंदरीत बाजारपेठ उन्हाळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. एकीकडे परीक्षांचे दिवस दुसरीकडे आरोग्य सांभाळण्याची कसरत आहे. व्हायरल आजाराने डोके काढले आहे. या सर्वांमध्ये आपल्याला आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा असेच काहीसे म्हणावे लागेल.