मुंबई: बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खान याला मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने बराच वेळ रोखून धरल्याची माहिती (Shah Rukh Khan) आहे. या मागील कारणही पुढे आले आहे. शाहरुख खान एका कार्यक्रमासाठी शारजाला गेला होता. शारजाहून येत असताना कस्टम विभागाने शाहरुखला त्याला रोखले. तब्बल एक तास शाहरुखची चौकशी सुरू होती. किंग खानच्या बॅगमध्ये अनेक महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडले. या घड्याळांची किंमत लाखो रुपये आहे. पण त्याची कस्टम ड्युटी न भरल्याने शाहरुखची चौकशी करण्यात आली. शाहरुखसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि बॉडीगार्डचीदेखील चौकशी करण्यात आली. शाहरुखला 6.83 लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान एका खाजगी चार्टर विमानाने आपल्या टीमसोबत शारजाला गेला होता. तेथून भारतात परतल्यावर मुंबई विमानतळावर कस्टम विभागाला शाहरुखच्या बॅगमध्ये लाखो रुपयांची घड्याळे आणि त्या घड्याळांचे महागडे बॉक्स सापडले. याबद्धल शाहरूखने सुरुवातीला माहिती दिलेली नव्हती. त्यानंतर शाहरुखची चौकशी झाली. त्याच्याजवळ आढळून आलेल्या घड्याळांची किंमत अंदाजे १८ लाख रुपये होती. या प्रकारामुळे शाहरुखला 6 लाख 87 हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. त्याच्या बॉडीगार्डने शाहरूखच्या क्रेडीट कार्डवरून हा कर भरला. शाहरुख खान 41 व्या शारजाह इंटरनॅशनल बुक फेअर या कार्यक्रमासाठी दुबईत गेला होता. शाहरुखला दुबईत ‘ग्लोबल आयकॉन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी शाहरुखला ग्लोबल आयकॉनने सन्मानित करण्यात आले आहे.