नागपूरः विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं विरोधकांना सत्तापक्षावर तुटून पडायची मोठी संधी असते. सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणारे जनसामान्यांचे मुद्दे शोधून ते आक्रमकपणे मांडायचे आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ आणायचे, हे विरोधी पक्षांचं कामच आहे. दोन आठवड्यांच्या हिवाळी अधिवेशनातील पहिला आठवडा उलटून गेला. पण, नागपुरातील गुलाबी थंडीत राजकीय तापमान काही फारसं वाढलं नाही. विरोधकांकडे फारसे प्रभावी मुद्देच नाहीत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारपुढे अधिवेशनाचं कुठलंच ‘आव्हान’ नाही, असेच चित्र मागील आठवड्यात दिसलं. विरोधक कुठले मुद्दे उपस्थित करु शकतात, याचं पुरेसं ‘इंटेलिजन्स इनपुट’ सत्तापक्षाकडे येत होतं. सत्तापक्ष बऱ्यापैकी तयारीत होता. त्यामुळे विरोधकांनी गोंधळ सुरु केला की त्याच्या प्रतिकारासाठी एखादा मुद्दा उपस्थित करून लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेण्याची रणनीती भाजप आणि शिंदे गटानं राबविली. ती बऱ्यापैकी यशस्वी ठरली.
नागपुरातील कथित भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचे महाविकास आघाडीचे आणि विशेषतः ठाकरे गटाचे प्रयत्न अत्यंत केविलवाणे ठरले. या मुद्यावर ठाकरे गटाचे पुरेसे होमवर्क नव्हते, हे त्यातून स्पष्ट झाले. त्यामुळे या मुद्यावर तोंडावर आपटण्याची पाळी ठाकरे गटावर आली. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाने दिशा सालियन प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची घोषणा करून प्रसार माध्यमांमध्ये मोठाल्या हेडलाईन्स मिळविण्याचा हेतू मात्र साध्य करून घेतला. या प्रकरणात काहीच दम नाही, याची कल्पना दोन्ही बाजुंना आहे. पण, शेवटी चर्चा तर होतेच ना!
विरोधकांना डोकं वर काढण्याची संधीच द्यायची नाही, असेच शिंदे-फडणवीस सरकारचे विधिमंडळ सभागृहांमधील डावपेच राहिलेले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष आजही आपल्या कोशात आहे. सरकारला अंगावर घेण्याची तयारी काँग्रेसमधील एकाही नेत्यामध्ये नाही किंवा त्या ताकदीचा नेता काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात नाही. शिवसेनेतील फुटीत सारेच आक्रमक आणि अनुभवी आमदार शिंदे गटात गेलेत. शिल्लक राहिलेल्या आमदारांमध्ये ती क्षमता नाही. याची प्रचीती वारंवार येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज नेत्यांची कमतरता नसली तरी मोठ्या प्रमाणात अंतर्विरोध दिसतो आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची कथित नरमाईच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. एकिकडे भूखंड प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरु असताना अजित पवारांची भूमिका अगदीच मवाळ होती, अशी ओरड ठाकरे गटातून ऐकायला मिळाली. त्यातून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात कुरबुरी वाढल्यास नवल वाटायला नको. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या गोटातही अस्वस्थता असल्याचे जाणवते आहे. सध्यातरी नेत्यांनी वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष व गटनेते जयंत पाटील हताश दिसले. त्यातूनच त्यांनी अधिवेशनातून अंग काढून घेतल्याची चर्चा ऐकायला मिळतेय. असो. तुर्तास तरी शिंदे-फडणवीस सरकारचा वारू चौखूर उधळतो आहे. नजिकच्या भविष्यात तरी त्याला विरोधकांकडून कुठले आव्हान मिळण्याची शक्यता दिसत नाही.