“तो रामसेतू आहे की नाही, हे सांगणं कठीण..” : केंद्र सरकार

0

नवी दिल्लीः भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या समुद्रात आढळून येणारी दगडांची रचना रामसेतू आहे की नाही, हे सांगणे कठीण असल्याचे स्पष्टीकरण केंद्रातील मोदी सरकारच्या वतीने संसदेत देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट (Modi Government Reply on Ram Setu) केली. जितेंद्र सिंह यांनी आपल्या उत्तरात तो राम सेतुच आहे की इतर कोणते बांधकाम, याविषयी खात्रीशीर दावा करता येणे कठीण असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातला इतिहास जवळपास १८ हजार वर्षांपूर्वीचा आहे आणि इतिहासकालीन दाखल्यांचा विचार करता या पुलाची लांबी ५६ किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे नेमके काहीच सांगता येत नसल्याचे जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सांगितले.


भाजपचे खासदार कार्तिकेय शर्मा यांनी रामसेतू संदर्भात राज्यसभेत प्रश्न विचारला होता. भारताच्या इतिहासाती घडामोडींची वैज्ञानिकदृष्ट्या चाचणी केली जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी राम सेतुचाही उल्लेख केला होता. त्यावर जितेंद्र सिंह यांनी उपरोक्त उत्तर दिले. मात्र, त्याचवेळी त्या ठिकाणी असणाऱ्या अवशेषांमध्ये एक प्रकारचे सातत्य आपल्याला दिसून येते असून त्यावरून आपल्याला नक्कीच काही अंदाज बांधता येतील, असा विश्वासही जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. त्या ठिकाणी नेमके कोणते बांधकाम होते हे नेमके सांगता येणे कठीण आहे. पण तिथे काही प्रत्यक्ष किंवा काही अप्रत्यक्ष खुणांवरून आणि अवशेषांवरून मात्र असे म्हणता येईल की तिथे एक बांधकाम होते, असेही ते म्हणाले.
रामायणातील कथेनुसार श्रीलंकेवर आक्रमक करून सीतेला सोडविण्यासाठी भगवान रामाने वानरसेनेच्या साह्याने राम सेतूची उभारणी केल्याचा उल्लेख आढळतो. मात्र, हा पूल खरेच अस्तित्वात होता की ही फक्त एक दंतकथा आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा