विधानभवनावर धडकला आम आदमी पार्टीचा ‘आपला महामोर्चा’ 

0

-शेतकरी, कष्टकरी, युवा, बेरोजगार, महागाईप्रश्नी वेधले लक्ष


नागपूर : आम आदमी पार्टीतर्फे आज सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी आपला महामोर्चा विधानभवनासमोर धडकला. हा मोर्चा महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. या महामोर्चात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला, राज्य संघटन मंत्री विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिन्दे, राज्य उपाध्यक्ष धनराज वंजारी व डॉ फैजी, विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेड़े, कुसुमाकर कौशिक, अंसार शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशा मागण्यासाठी आम आदमी पार्टीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर शुक्रवारी धडक दिली. शिष्टमंडळाचे निवेदन कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी घेतले व शिष्टमंडळाला यावर चर्चा करून व योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली. यावर्षी राज्यात अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरकारने काही प्रमाणात मदत जाहीर केली परंतु ती फार अल्प आहे. दुसरीकडे विमा कंपन्या शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य करीत नाहीत, बरेच चुकीचे किंवा क्लिष्ट नॉर्म असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यावर सुद्धा विमा रक्कमेपोटी भरलेल्या रक्कमेइतकी देखील मदत सुद्धा मिळत नाही, ही वास्तविकता आहे. तसेच राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा आर्थिक तरतुदीविना फारच खालावला आहे, त्यामुळे शाळांमधील पट संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, परंतु सरकार कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. दुसरीकडे राज्यातील बिना अनुदानित शाळा भरमसाठ शुल्क आकारणी करून पालकांची लूट करीत आहेत आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.