औरंगाबाद : शिक्षणाचा दर्जा ढासळल्याची तक्रार सातत्याने होत असताना आता शिक्षकांचीही परीक्षा घेतली जाणार (Exams for Teachers for quality education) आहे. मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून यापुढे पहिली ते दहावीच्या शिक्षकांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करण्यात आल्यावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासनाने कोरोनानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर तपासला असता तो खूपच खालावल्याचे आढळून आले. त्यात शाळा बंद होत्या व ऑनलाईन शिक्षणाचा विशेष काही परिणाम झाला नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. शाळांच्या सर्वेक्षणात अनेक शिक्षक त्यांच्या विषयांत पारंगत नसल्याचे समोर आले. फारच कमी प्रमाणात शिक्षक त्यांच्या विषयात तज्ज्ञ असल्याची वस्तुस्थिती पुढे आली. त्यामुळे त्यामुळे शिक्षकांची देखील परीक्षा घेतली पाहिजे, असा निर्णय घेतला असल्याचे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी सांगितले.
केंद्रेकर यांनी सांगितले की, संस्था आणि त्यांच्या शिक्षकांची देखील परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच या परीक्षांचा स्तर कठीण राहणार असून, सर्वच शाळांमध्ये अशा परीक्षा घेतल्या जाणार आहे. परीक्षेत निगेटीव्ह मार्कींग राहणार आहे. प्रश्नांना उत्तरांचे पर्याय राहतील तसेच विज्ञान,गणित आणि इंग्रजी या तीन विषयांच्या परीक्षांवर अधिक भर राहणार आहे. केंद्रेकर यांच्या मते शिक्षकांनी या परीक्षा दिल्या पाहिजे असा आमचा आग्रह असणार आहे. परीक्षा देणे बंधनकारक राहणार की कसे, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शिक्षक वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.