
(Mumbai)मुंबई :- मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा तसेच रसिक मनाला रानाशी मैत्र घडवून देणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, या शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Poet N. D. Mahanor)कवी ना. ध. महानोर यांच्या निधनावर शोकसंवेदना व्यक्त केल्या.
(CM Ekanath Shinde)मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाली आहे. मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्य अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेतातून, साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या सगळ्याच ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटवली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
(Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाला रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !