Home Breaking news सत्ताधाऱ्यांवर नियंत्रणासाठी विरोधकांची भूमिका महत्त्वाची – आ. विजय वडेट्टीवार

सत्ताधाऱ्यांवर नियंत्रणासाठी विरोधकांची भूमिका महत्त्वाची – आ. विजय वडेट्टीवार

0

संसदीय लोकशाहीतील सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या भूमिकेवर व्याख्यान

नागपूर, दि. 10 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामध्ये आदर्श संसदीय लोकशाहीची चौकट आहे. या लोकशाहीत सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्ष देखील समान महत्त्वाचा आहे. विधानभवनात आयोजित 51 व्या संसदीय अभ्यासवर्गातील व्याख्यानात ‘संसदीय लोकशाहीत सत्तारूढ व विरोधी पक्षाचे स्थान व भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करताना लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानमंडळाच्या सचिव मेघना तळेकर उपस्थित होत्या. सुरुवातीला तळेकर यांनी वडेट्टीवार यांचा परिचय करून दिला.
वडेट्टीवार म्हणाले की, शासन आणि प्रशासन पारदर्शक असणे आवश्यक आहे. जनतेच्या वतीने शासनाला प्रश्न विचारण्याची महत्त्वपूर्ण भूमिका विरोधी पक्ष निभावत असतो. शासनाच्या चुकीच्या धोरणांवर लक्ष वेधण्याचे, निर्णयातील त्रुटी जनतेपुढे आणण्याचे कार्य विरोधी पक्ष करतो. “सत्ताधारी पक्षासोबत समांतर वेगाने चालणारा मजबूत विरोधी पक्ष ही प्रगल्भ लोकशाहीची निशाणी आहे,” असे ते म्हणाले.
चांगल्या कामांसाठी विरोधी पक्ष सदैव सरकारसोबत उभा असतो, तर दुसरीकडे सकारात्मक सूचना करून शासनाला दिशा देण्याचेही कार्य करत असतो. अविश्वास प्रस्ताव बहुतेकदा संख्याबळामुळे मंजूर होत नसले तरी शासनाच्या चुका व जनतेच्या प्रश्नांना सभागृहात योग्य प्रकारे मांडण्यासाठी ते आवश्यक असतात, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
संसदीय लोकशाहीत सदस्यांना आपली मते, प्रश्न, समस्या मांडण्यासाठी विविध संसदीय साधने उपलब्ध आहेत. विरोधी पक्षातील नेता देखील या साधनांचा योग्य वापर करून आपल्या मतदारसंघातील कामांसाठी मंजुरी मिळवू शकतो, ही संविधानाची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
“शेवटी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष या दोन्ही बाजूंची भूमिका महत्वाची आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यातून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणावा,” असे आवाहनही आ. वडेट्टीवार यांनी केले.