रेल्वे रुळांवर उभं राहून रिल्स काढण्याचा नाद तिघांच्या जीवावर बेतला

0

गाझियाबाद : जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याचा किंवा रिल्स तयार करण्याचा नाद कसा जीवघेणा ठरू शकतो, याचा प्रत्यय अपघाताच्या घटनांच्या माध्यमातून वारंवार येत आहे. मात्र, तरीही त्यापासून धडा घेतला जात नसल्याचे प्रकरण उत्तर प्रदेशात गाझीयाबादच्या मसुरी परिसरात उघडकीस आले आहे. या घटनेत एक तरुण व दोन तरुणांचा रेल्वेगाडीची धडक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना (Hit by Train While Making Reels Near Railway Track) घडली. येथील कल्लू गढी रेल्वेमार्गावर ही घटना घडली. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे वय 22 ते 25 च्या आसपास तर दोन्ही तरुणांचे वय 30 ते 35 वर्षे दरम्यान आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्लू गढी येथील रेल्वेमार्गावर एक तरुणी व दोन तरुण रिल्स तयार करीत होते. या दरम्यान, त्यांना रेल्वेगाडीचे भान देखील राहिले नाही. त्यांना पद्मावत एक्सप्रेसची धडक बसली व तिघेही घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले. स्टेशन मास्टरने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून तिघांची ओळख पटलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ही घटना काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. यापूर्वीही जीव धोक्यात घालून रेल्वेत व्हिडिओ तयार करण्याचे प्रकार निदर्शनास आलेले आहेत. रेल्वेच्या दारावर लटकून व्हिडिओ तयार करणाऱ्या अनेकांवर पोलिसांकडून कारवाई देखील झाली आहे. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून जीव धोक्यात न घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा