नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या ५ डिसेंबरला पार पडणार आहे. यासाठी मुंबईतील आझाद मैदान (Azad Maidan in Mumbai) निश्चित करण्यात आलं असून महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आझाद मैदानात दुपारी एक वाजता हा शपथविधी सोहळा होणार असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. तर येत्या तीन डिसेंबर रोजी भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक होणार आहे. भाजपचे निरीक्षक राज्यात येऊन गटनेत्याची निवड करणार आहेत. तर दुपारी येत्या ५ डिसेंबरला नव्या सरकारमधील मुख्यमंत्र्याचा शपथविधी होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहतील.
शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यातही जल्लोष करा, अशा सूचना चंद्रशेखर बानवकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पासेस देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाणार आहे. तर यामध्ये १५ ते १६ हजार विशेष पासेसची व्यवस्था असणार आहे.