maharashtra assembly election 2024 :महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेत येताच काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले. त्यातही काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली. मात्र, त्यांच्या शुक्रवारी झालेल्या कार्यसमितीच्या बैठकीत संमत झालेल्या ठरावात ईव्हीएमचा साधा उल्लेखही नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमची ईव्हीमएमवर शंका नाही, तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप आहे, अशी भूमिका मांडली. ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करताना कायदेशीर लढाई लढताना मात्र काँग्रेस मागे हटताना दिसते, पण आरोप करण्यात पुढे असल्याचे चित्र आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आपण खरेच ईव्हीएम हॅक होऊ शकते का, EVM मध्ये घोटाळा शक्य आहे का, मतदान ते मतमोजणी या काळात ही यंत्रे कशी काम करतात, जाणून घेऊयात.
मतदान ते मतमोजणी यंत्राद्वारे कशी होते?
1) EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. हा तीन यंत्रांचा संच असतो. त्यात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट युनिट असतात. प्रत्येक मशीनला क्रमांक असतो. ही मशीन जिल्ह्यानिहाय येतात. ती आल्यावर फर्स्ट लेव्हल क्लिनिंग सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष होतं. या यंत्रांवरचे सर्व नोंदी, सीलं इत्यादी काढून टाकली जातात. या यंत्रांमधील डेटा काढून टाकला जातो. नादुरुस्त यंत्रं कंपनीला परत पाठवली जातात. एका जिल्ह्यासाठी काही हजार यंत्रं येतात. त्यामुळे ही प्रक्रिया काही दिवस चालते.
2) ईव्हीएम संदर्भात हे झाल्यावर डमी व्होटिंग केलं जातं.
3) ईव्हीएम यंत्रं स्टोर रुममध्ये सीलबंद केली जातात. तिथे पोलीस पाहारा असतो. त्याशिवाय सीसीटीव्हीची पाळत असते.
4) ईव्हीएम यंत्रांचे क्रमांक प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिले जातात.
5) प्रत्येक मतदान केंद्रांवर कोणती यंत्रं पाठवली जाणार याचं वाटप सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर तीन-चार वेळा केली जाते. जेणेकरून यंत्रसंचात गडबड घोटाळा होणार नाही याची खातरजमा केली जाते.
6) प्रत्येक मतदान केंद्रावर कोणते यंत्रसंच पाठवले जाणार याची यादी उमेदवाराच्या कार्यालयाला मिळते.
7) उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सदर यादीनुसार यंत्र संच आले आहेत याची खातरजमा करायची असते.
8) उमेदवार प्रतिनिधींच्या खातरजमेनंतर एक हजार मतांचं चांचणी मतदान घेतलं जातं. ज्या चिन्हाचं बटण दाबलं की त्याच चिन्हाची नोंद व्हीव्हीपॅटवर होते आहे, याची खातरजमा केली जाते. सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी प्रत्येक मतदान केंद्रांवर असतात. त्यांच्या समक्ष ही चाचणी घेतली जाते. त्यासंबंधात ते आक्षेप घेऊ शकतात.
9) मतदान किती वाजता सुरू झालं, किती मतदान झालं, मतदानाच्या दरम्यान कोणतं मशीन का बदललं, मतदान केव्हा संपलं इत्यादीची नोंद असलेला फॉर्म १७-सी प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिला जातो.
10) मतपेट्या वा इव्हीएम चा संच कडेकोट बंदोबस्तात ठेवला जातो. तिथे सीसी टिव्हीची निगराणी असते. त्याशिवाय उमेदवारांच्या प्रतिनिधींचाही पाहारा असतो.
11) मतमोजणी सुरू करण्यापूर्वी आलेल्या यंत्रांमधून कोणत्याही पाच यंत्रांची निवड करून व्हीव्हीपॅटवरील नोंदी आणि मतदान यांचा ताळमेळ बसतो आहे का याची खातरजमा सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते.
12) मतमोजणी बूथनिहाय होते. प्रत्येक बूथवरील मतदानाचा तपशील फॉर्म 17 सी वर नोंदलेला असतो. सदर नोंदीनुसार मतमोजणी होते आहे का, ह्यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी लक्ष ठेवायचं असतं. उदा. एखाद्या बूथवर 100 मतदारांनी मतदान केल्याची नोंद फॉर्म 17 सी वर असेल तर त्या बूथच्या मतपेटीत 100 मतंच निघाली पाहिजेत. कमी वा जास्त मतं असल्यास तात्काळ मतमोजणी थांबवण्याची मागणी उमेदवारांचे प्रतिनिधी करू शकतात.
13) उमेदवारांचे प्रतिनिधी प्रशिक्षित नसतील, सावध नसतील, तर हेराफेरी होऊ शकते. उदा. फॉर्म 17 सी नुसार मतपेटीत मतं आहेत का याची खातरजमा केली तर तफावत ध्यानी येऊन त्यावर तात्काळ आक्षेप घेणं आणि सदर तक्रारीची पोच घेणं हा पुरावा हाताशी असतो.
मतमोजणीपूर्वी मतं आणि व्हीव्हीपॅट यांचा ताळमेळ होता का याबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप वा तक्रार केली होती का…तसा पुरावा आहे का…
14) प्रत्येक टप्प्यावर असे पुरावे असतील तर आक्षेप घेणार्यांची बाजू भक्कम होते. एकाही उमेदवाराकडे यापैकी एकही पुरावा नाही. नोंदी नाहीत. माझ्या घरातली माणसं मला मतदान करणार नाहीत का? अमक्या गावात माझ्या संस्थेत काम करणारे शेकडो लोक आहेत, त्यापैकी एकही मत मला मिळणार नाही का? मतपत्रिकेने मतदान झालं तरिही हा आक्षेप घेता येतो. हे आक्षेप गुप्त मतदानात टिकणारे नाहीत.
15) इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम वा प्रणाली काय आहे, ती कशी राबवायची ह्याची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर आहे. ती वाचून बातम्या वा मतं मांडावीत.
16) इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे संच जिल्हा व मतदारसंघात येण्यापासून ते मतमोजणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेतलं जातं. त्यांना अधिकारही असतात.
17) 288 पैकी एकाही मतदारसंघातली एकाही उमेदवाराच्या प्रतिनिधीने त्याच्या मतदारसंघात झालेलं मतदान आणि निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं त्याच्या मतदारसंघातील मतदान यामध्ये तफावत असल्याचं जाहीरपणे म्हटलेलं नाही. म्हटलं असल्यास त्याची पुष्टी करणारा पुरावा दिलेला नाही.
18) 288 मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरुवात करण्याच्या आधी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे कोणतेही पाच संच निवडले जातात. या संचातील व्हीव्हीपॅटवर नोंद झालेली मतं (म्हणजे मतपत्रिका) आणि कंट्रोल युनिटमध्ये नोंदवलेली मतं यांची पडताळणी केली जाते. प्रत्येक उमेदवाराला किती मतं दोन्हीकडे मिळाली आहेत, त्यांची बेरीज बरोबर आहे का हे तपासलं जातं.
19) 288 मतदारसंघातील एकाही पोलिंग एजंटने यासंबंधात निवडणूक अधिकार्याकडे तक्रार केली वा आक्षेप घेतला याचा कोणताही पुरावा एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याकडे वा पत्रकारांकडे नाही. पराकला प्रभाकर सारखे सर्वजण अडाणी तर्क लढवत असतात. त्याच्या बातम्या सकाळपासून माझ्याकडे लोक व्हॉटसअॅपवर पाठवत आहेत. अमका तसं म्हणाला, तमका हे म्हणतोय. महाविकास आघाडी असो वा अन्य कोणताही राजकीय पक्ष, त्यांनी आपल्यापुढे असलेल्या राजकीय आणि वैचारिक आव्हानाकडे लक्ष द्यावं तरच त्यांना आणि महाराष्ट्राला नवी आशा आहे.
20) मतपत्रिकेद्वारे मतदान व्हायचं त्यावेळीही प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी प्रत्येक मतदानकेंद्रांवर असायचे. मतपत्रिकांची मोजणी ही कटकटीची बाब होती. कारण मतदाराने दिलेल्या रकान्याच्या किंचित बाहेर वा बाहेर खूण केली तर ते मत ग्राह्य धराययचं की नाही….असे अनेक प्रश्न उपस्थित व्हायचे. त्याशिवाय बूथ कॅप्चरिंगही व्हायचं. मतमोजणीसाठी हजारो माणसं कामाला लावायला लागायची. त्यातही चुका व्हायच्याच.
21) सध्याची इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम अधिक प्रगत करण्याची गरज आहे. काही अनियमितता वा उणिवा त्यामध्ये आहेत म्हणून ते कट-कारस्थान आहे असं म्हणणं पूर्णपणे अवैज्ञानिक आहे.