नागपूर (NAGPUR) विदर्भ व मराठवाड्यासह (Vidarbha and Marathwada) राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरण होऊ मेघगर्जना आणि वेगवान वाऱ्यांसह पाऊस कोसळत आहे. ऐन एप्रिल महिन्यात पावसाळी वातावरण तयार होत असल्याने यंदाच्या मॉन्सूनची स्थिती काय राहणार? याविषयी चिंता व्यक्त होत आहे. परिस्थिती अशी बदलण्याची कारणे काय आहेत, याचे कुतुहल देखील सर्वसामान्यांमध्ये दिसून येते. मात्र, हवामान तज्ज्ञ व भारतीय हवामान विभागाचे पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर (India Meteorological Department) यांच्या मते अवकाळी पावसाची ही परिस्थिती निर्माण होण्यामागे अनेक कारणे असून त्यातून मध्य व उत्तर भारतावर हवामानाची विशिष्ट ‘सिस्टीम’ तयार होऊन मागील दोन महिन्यांपासून अवकाळी पावसाची स्थिती तयार होत आहे.
विदर्भात आगामी चार ते पाच दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मेघगर्जना व वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. उष्णतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळ्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडतो आहे. ही परिस्थिती नेमकी कशामुळे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हवामान शास्त्रज्ञ होसाळीकर यांनी सांगितले की, “प्रत्येकच वेळी वेगवेगळ्या कारणांनी ही स्थिती तयार होत आहे. त्यात विरुद्ध दिशेने येणारे वारे एकमेकांवर आदळून तयार होणारी रेषा व त्यातून वर जाणाऱ्या हवेमुळे तयार होणारे पाण्याचे ढग हे एक महत्वाचे कारण आहे. ही परिस्थिती यापूर्वीही अनेकदा तयार झाली आहे.”
मे अखेर कळतील नेमके अंदाज
सध्याच्या अवकाळी पावसाच्या परिस्थितीचा आगामी मॉन्सूनवर नेमका काय परिणाम होणार, याविषयी सांगताना होसाळीकर यांनी सांगितले की, भारतीय हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज दोन आठवड्यांपूर्वी जाहीर झाला आहे. त्यात पावसाचे प्रमाण सरासरी ९६ टक्के राहील, असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग अनेक देशांकडूनही माहिती घेत राहते. आता मे महिन्याच्या अखेरीज देशाच्या चार भौगोलिक क्षेत्रांबद्लचे मॉन्सूनविषय अंदाज येणार आहेत. त्यातून मॉन्सूनबाबत अचूक आकलन मिळू शकेल, असे होसाळीकर यांनी सांगितले.
पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा
राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळीचा फटका बसलत आहे. यामुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे.हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह अवकाळीचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा मात्र, शेती पिकांना फटका बसत आहे. राज्यात पुढील पाच दिवस किमान तापमान चार डिग्रीने तर कमाल तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील पाच दिवस राज्यात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचंही हवामान विभागानं सांगितलं आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह अवकाळीचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात मात्र या पाच दिवसात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीटीची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळं फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच भाजीपाला पिकालाही फटका बसला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याची मोठी नासाडी झाली आहे.
आधीच बदलतं वातावरण आणि अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच पुन्हा आणखी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे 26 एप्रिल आणि 27 एप्रिलला पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता आहे.