शेख हसीना ( Sheikh Hasina) यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर परागंदा व्हावं लागलंच. आयुष्यात दोन वेळा त्यांना आपला देश सोडावा लागला. आज प्रणब मुखर्जी जिवंत असते तर त्यांना काय वाटलं असतं ? हा प्रश्न विचारण्यामागे एक कारण आहे.
बांगलादेश (Bangladesh)स्वतंत्र झाल्यानंतर शेख हसीनांचे वडील शेख मुजीबर रहमान हे त्या देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. परंतु फार लवकरच तेथे क्रांती होऊन त्यांना वंगबंधू शेख मुजीबर यांना ठार करण्यात आलं. सुदैवाने वाचलेल्या शेख हसीना आपले पती एम.ए.वाझेद मियां, दोन छोटी मुले जाॅय, पुतुल यांना घेऊन १९७५ साली भारतात आल्या. भारतात त्यांनी राजकीय आश्रय घेतला. तेव्हा सरकारने त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची पूर्ण जबाबदारी त्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee)यांच्या वर सोपवली होती. प्रणब यांनी पूर्ण निष्ठेने ती निभावली. प्रणब व शेख हसीना यांच्यातील निकटच्या संबंधाची ती सुरुवात होती.
शेख हसीना यांचे प्रणबशी चांगले संबंध होतेच पण त्यांच्या पत्नीशीही होते. लवकरच त्यांचे कौटुंबिक संबंध निर्माण झाले.मुखर्जींच्या घरी असलेल्या प्रत्येक कौटुंबिक समारंभात हसीना कुटुंबीय हजर असायचे. मग ते वाढदिवस असोत, स्नेहसंमेलन असोत की सहली असोत. शेख हसीना कुटुंबातील साऱ्यांना मुखर्जी कुटुंबीय आपल्यात सामील करून घ्यायचे. काही ठरावीक लोकांव्यतिरिक्त कोणालाही शेख हसीनांची खरी ओळख सांगितली गेली नव्हती. प्रणब यांची पत्नी इतरांना त्यांची ओळख आपली छोटी बहीण म्हणून करून देत असे. हसीनांनीही ते संबंध निगुतीने जपले.पुढे बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्यावर देखील त्या मुखर्जी कुटुंबियांशी संपर्क ठेवून होत्या. अधूनमधून त्या डाक्क्याच्या जमदानी साड्या पाठवायच्या. मग येथूनही परत भेटी दिल्या जात. एकदा प्रणब यांची मुलगी शर्मिष्ठा बांगलादेशला गेली असता, त्यांनी भावूक होऊन तिला म्हटलं, “तुझ्या आईचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. मी भारतात आले तेव्हा माझे वडील, माझं सारं कुटुंब संपवलं गेलं होतं. मी भावनिकदृष्ट्या कोसळले होते.त्यावेळी अज्ञातवासात असलेली मी तुझ्या आईमुळे सावरली गेली. अन्यथा मी वेडी झाली असते. तिनं आम्हाला तुमच्या कुटुंबात सामील करून घेतलं.तिच्या या प्रेमामुळेच ते खडतर दिवस मी ढकलू शकले.”
हे शब्द फक्त ‘ बोलायचीच कढी आणि बोलायचाच भात ‘ पुरतं नव्हतं. २०१० साली पंतप्रधान असताना त्या भारताच्या शासकीय दौऱ्यावर होत्या, तेव्हा प्रणब यांची पत्नी आजारी होती. तेव्हा ती त्यांना भेटायला जाऊ शकणार नव्हती. तेव्हा शिष्टाचाराचा बाऊ न करता त्या आपली बहीण रेहानासह त्यांना भेटण्यासाठी मुखर्जींच्या घरी आल्या. जेव्हा २०१५ साली त्यांचं निधन झालं तेव्हा त्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीला आल्या. त्यावेळी त्यांना आपले अश्रू आवरत नव्हते.
प्रणब मुखर्जी यांच्याशीही त्यांचे असेच निकटचे संबंध होते. त्या जेव्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या, तेव्हा प्रणब साधे केंद्रीय मंत्री होते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधताना शिष्टाचार पाळणे आवश्यक असायचं. पण शेख हसीनांनी ते कधीही पाळले नाहीत. त्या थेट प्रणबना फोन करायच्या. मग ते त्यांना समजावायचे की असं पंतप्रधानाने दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांला थेट फोन करणं शिष्टसंमत नाही. तर त्या बंगालीत त्यांना बोलायच्या ” दादा, राखेन आपनार प्रोटोकॉल. ”
पुढे प्रणब हे तीन आठवडे कोमामध्ये होते. तेव्हा त्या दररोज फोनवर त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायच्या. प्रणब यांचं निधन झालं तेव्हा बांगलादेशने एक दिवसाचा दुखवटा पाळला.
मुखर्जी कुटुंबियांशी शेख हसीना नेहमी इमानी राहिल्या.पण बांगलादेशीय मात्र भारताशी इमानी राहिले नाहीत ही भारतीयांची ठसठसणारी वेदना आहे !
आज शेख हसीना ७५ वर्षांच्या आहेत. पुन्हा त्या बांगलादेशात परतु शकतील ? इतिहासाची पुनरावृत्ती होईल ?
सध्या तरी तेथून निघताना त्यांनी आपल्या मायभूमीला ‘ अखेरचा दंडवत ‘घातला असेल.
( संदर्भ: प्रणब, माय फादर
शर्मिष्ठा मुखर्जी)
प्रदीप राऊत