पोंभुर्णा तालुक्यातील दहा गावांना पेसा लागू करण्यासाठी पुढाकार
ना. श्री. मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांच्या उपस्थितीत राज्यपालांना दिले निवेदन
आदिवासी संस्कृती व परंपरेचे जतन करण्यासाठी सदैव कटिबद्ध
चंद्रपूर (Chandrapur), दि.07- आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी, त्यांची संस्कृती व परंपरेचे जतन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे पोंभुर्णा तालुकाध्यक्ष जगन येलके यांनी आदिवासी समाजाच्या वतीने आभार मानले आहेत. राज्यपाल महोदय सी.पी. राधाकृष्णन (Governor Mr. C.P. Radhakrishnan)यांच्यासोबत समाजाच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्याची व त्यांना निवेदन देण्याची संधी ना. श्री मुनगंटीवार यांच्यामुळे प्राप्त झाल्याबद्दल आदिवासी बांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पंचायत विस्तार अधिनियम, 1996 अंतर्गत (पेसा) चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा तालुक्यातील कसरगट्टा (हेटी), चेकआष्टा, देवई, भटारी, केमारा, चिंतलधाबा – 1 , चिंतलधाबा – 2 , सातारा तुकुम, सातारा भोसले, खेरगाव ही 10 गावे पेसा अनुसुचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची विनंती आदिवासी समाजाने केली होती.यासंदर्भातील आदिवासी बांधवासमवेत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल महोदयांची आज भेट घेतली.
मंगळवारी (दि.7) ना. श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पोंभुर्णा येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुकाध्यक्ष जगन येलके यांनी राज्यपाल महोदयांना निवेदन दिले. संबंधित दहा गावे पेसा म्हणून घोषित करण्याची मागणी तेथील ग्राम पंचायतींनी शासनाकडे केली आहे. या 10 गावांतील अनुसुचित जमातीची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 50 टक्यांपेक्षा जास्त आहे. ही गावे पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदिवासी विकास विभाग मंत्रालयात सादर करण्यात आला आहे, याचा उल्लेख ना. श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी राज्यपाल महोदयांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पेसा संदर्भात राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भात पुढाकार घेण्याबद्दल मा.राज्यपाल यांनी आश्वस्त केले.त्याबद्दल आदिवासी बांधवांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.
राज्यपाल महोदय पोंभुर्णा येथे येणार
दिवाळीच्या कालावधीत राज्यातील आदिवासी भागाचा दौरा करतांना पोंभुर्णा तालुक्यात आदिवासी पारंपारीक उत्सवात उपस्थित राहण्याची ग्वाही, राज्यपाल महोदयांनी ना. श्री. मुनगंटीवार व जगन येलके आणि उपस्थित गोंडवाणा गणतंत्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. आदिवासी समाजाची संस्कृती जोपासण्यासाठी सर्व प्रयत्न होतील, असेही राज्यपाल महोदयांनी यावेळी सांगितले.
आदिवासी समाजाचा विकास कायम अजेंड्यावर
आदिवासी समाजाला आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आदिवासी समाजातील तरुण आज प्रत्येक क्षेत्रात मोठे नाव कमावत आहेत. त्यांच्या प्रगतीला चालना देणे आणि एकूणच आदिवासी समाजाचा विकास करणे कायम अजेंड्यावर राहील, अशी प्रतिक्रिया ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
आमच्यासाठी विजयाचा दिवस
9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन आमच्यासाठी विजयाचा दिवस आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे राज्यपाल महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आदिवासी समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे यंदाचा जागतिक आदिवासी दिन आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा आणि विजयाचा दिवस आहे, अशी भावना जगनभाऊ येलके यांनी व्यक्त केली आहे.