

नागपूर(Nagpur), 31 मे : ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि अभ्यासक डॉ. विवेक गोखले लिखित ‘संगीताच्या संगती’, ‘सौंदर्यवेध – वाद, विवाद व विवेक’ आणि ‘मर्ढेकर आणि टीकाकार – भ्रांत कोण?’ या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा बुधवार, ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने राहणार असून अमरावतीच्या ज्येष्ठ वक्ता आणि प्राध्यापिका डॉ. विजया डबीर, ज्येष्ठ कवी आणि निवृत्त प्राध्यापक सुरेश देशपांडे, ज्येष्ठ वक्ते प्रकाश एदलाबादकर, कवी आणि गीतकार अनिल शेंडे आणि नाट्यसंगीत गायिका सौ. विशाखा मंगदे हे मान्यवर वक्ते पुस्तकांवर भाष्य करणार आहेत.
सुनिधी पब्लिशर्स, पुणे द्वारा प्रकाशित या तिन्ही पुस्तकांमधील डॉ. गोखले यांच्या विविधांगी लेखनातून साहित्य, संगीत आणि समीक्षेच्या क्षेत्रातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली देशपांडे करणार असून, साहित्यप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रा. डॉ. साधना शिलेदार व सुनिधी पब्लिशर्सचे अविनाश काळे यांनी केले आहे.


















