Home Artical Blog बकऱ्या घरी परतल्या, पण गुराखी परतलाच नाही

बकऱ्या घरी परतल्या, पण गुराखी परतलाच नाही

0

वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू, मोटेगाव परिसरात भीतीचे वातावरण

चिमूर(Chimur): चिमूर तालुक्यातील मोटेगाव जंगल परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाला. दुपारी बकऱ्या घरी परतल्या, मात्र त्यांना चारण्यासाठी गेलेला गुराखी परत न आल्याने ही घटना उघडकीस आली.

मृत व्यक्तीचे नाव दिलीप जानबा ननावरे (वय ४५), रा. मोटेगाव असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप ननावरे हे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी मोटेगावजवळील बद्री टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या तलोधी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३८ मध्ये गेले होते. सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या एका मोठ्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दुपारच्या सुमारास बकऱ्या घरी परतल्या; मात्र दिलीप ननावरे घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना संशय आला. त्यांच्या मुलाने वडिलांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तो काही मुलांसह जंगलात शोध घेण्यासाठी गेला. शोधादरम्यान घटनास्थळी फाटलेले कपडे आणि एक कुऱ्हाड आढळून आली. त्यामुळे घाबरलेल्या मुलांनी गावात परत जाऊन ग्रामस्थांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच गावातील युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने जंगलात दाखल झाले व शोधमोहीम सुरू केली. दीर्घ शोधानंतर घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावरील झुडपांमध्ये दिलीप ननावरे यांचा मृतदेह आढळून आला.

माहिती मिळताच ब्रह्मपुरीचे सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) गायकवाड, तलोधी वनपरिक्षेत्र अधिकारी अनूप कन्नमवार, वन विभागाचे कर्मचारी तसेच चिमूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे पाठविण्यात आला.

घटनेनंतर मोटेगाव व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात गेल्या काही काळापासून वाघाचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाघाला तातडीने जेरबंद करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. वन विभागाने मृताच्या कुटुंबीयांना तत्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

ग्रामीणांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाकडे ठोस कारवाईची मागणी:

दिवसा घडलेल्या या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांतील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वन विभागाने गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tiger - Wikipedia