मुंबई: वंचित बहुजन आघाडी ही भाजपसोबत गेली नाही आणि जाणारही नाही. आमच्या पक्षाची भूमिका कुठेही बदलेली नाही, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाशी युतीचा निर्णय घेणाऱ्या प्रकाश आंबेकरांनी दुसरीकडे बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तब्बल अडीच तास चर्चा केली (Meeting between CM Shinde and Prakash Ambedkar). त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु आहे. मात्र, त्यावर आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले. एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर शिंदेंसोबत जाऊ, असे स्पष्ट करीत त्यांनी शिंदे आणि आंबेडकर युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या भेटीत इंदु मिल स्मारकाबाबत चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केलाय.
प्रकाश आंबेडकर म्हणाल की, आम्ही निवडणुका ठाकरेंसोबतच लढवणार आहोत. भाजपला आमचा विरोध कायम आहे. भाजसोबत असणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाणार नाही. एकत्र लढण्याबाबत ठाकरेंनी जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री बंद दाराआड अडीच तास बैठक झाली आहे.
काय झाली चर्चा
दरम्यान, आंबेडकर यांच्याकडून वेगळे दावे होत असले तरी प्रत्यक्षात आंबेडकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करु नये, असा आग्रह शिंदे गटाकडून त्यांच्याकडे धरण्यात आल्याचे समजते. त्यासाठी शिंदे यांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकाश आंबेडकर ठाकरे गटासोबतच्या युतीवर ठाम असल्याचीही माहिती समोर आली आहे. यापूर्वी देखील 16 नोव्हेंबरला मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाली आहे.
या भेटीवर आंबेडकर म्हणाले कीी, काल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत अनेक चर्चा झाल्या. आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. भाजप ज्यांच्याबरोबर आहे त्यांच्याबरोबर आम्ही कधीही गेलो नाही. आरएसएस आणि भाजप विरोधातील आमचे भांडण व्यवस्थेविरोधातले आहे. भाजप आणि मित्रपक्षांबरोबर कोणताही समझोता नाही. जर शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.