Uddhav Thackerayलोकशाही नव्हे, ही तर उद्धव ठाकरे यांची पक्ष वाचविण्याची धडपड!, भाजपची टीका

0
मुंबईः जनादेशाची पर्वा न करता सत्ता मिळविताना लोकशाहीचे सामान्य संकेत झुगारणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता सत्ता आणि पक्षदेखील हातातून निसटल्यावर लोकशाही वाचविण्याचा साक्षात्कार व्हावा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विनोद आहे, अशी घणाघाती टीका प्रदेश भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केली. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, जे हिंसाचार माजवितात आणि ज्यांनी सातत्याने मानवी हक्कांची पायमल्ली करण्याचे उद्योग केले, अशांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे लोकशाही वाचवायला निघाले आहेत, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.
प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याखेरीज स्वकर्तृत्वाच्या बळावर ज्यांना पक्ष वाढविता येत नाही असे उद्धव ठाकरे आता लोकशाही वाचविण्याचा बहाणा करत असले तरी प्रत्यक्षात मात्र, मिळेल त्याला हाताशी धरून उरलासुरला पक्ष वाचविण्याची त्यांची केविलवाणी ध़डपड सुरू आहे, असे उपाध्ये म्हणाले. हिंसाचार करून गरीबांना वेठीस धरणाऱ्या आणि देशात अस्थिरता माजविणाऱ्या नक्षलवाद्यांचे उघड समर्थन करणाऱ्यांच्या साथीने उद्धव ठाकरे लोकशाही वाचविणार की लोकशाही संकटात टाकणार असा सवालही उपाध्ये यांनी केला. वैचारिक विरोधावर विश्वास नसलेल्या व दहशत माजविण्याचाच इतिहास असलेल्या संभाजी ब्रिगेडसोबतही ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी युती केली. हिंदुत्वाची अस्मिता असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची निंदा करणाऱ्या काँग्रेसपुढे गुडघे टेकले आणि सत्तेसाठी राष्ट्रवादीचा लाळघोटेपणा करून स्वाभिमान खुंटीला टांगला, ते ठाकरे लोकशाही संकटात असल्याचा कांगावा करतात हे हास्यास्पद आहे.
मुळात उद्धव ठाकरे यांनी स्वतःच लोकशाहीला तिलांजली दिली असून त्यांच्या हुकूमशाहीला कंटाळल्यामुळेच शिवसेनेत फूट पडली. मातोश्रीवर भेटीसाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना अपमानित करणे, त्यांना साधी भेटही न देता ताटकळत ठेवणे आणि एकाधिकारशाहीने पक्ष चालविणे हेच शिवसेनेच्या ऱ्हासाचे कारण असल्याचे उघड झाले आहे. ज्यांना पक्षातही लोकशाही टिकविता आली नाही, बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे भाजपची साथ घेऊन सत्तेपर्यंत पोहोचलेला पक्ष ज्यांनी आपल्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे संपविला आणि ज्यांनी खंजीर, कोथळा अशा हिंसक शब्दांनी लोकशाहीच्या सभ्यतेला काळीमा फासला ते उद्धव ठाकरे आता पक्ष संकटात सापडल्यामुळे लोकशाही वाचविण्याचा ढोंगीपणा करत पक्ष वाचविण्याची धडपड करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.