नवी दिल्ली : महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद चिघळून त्यावर पुन्हा तणातणी सुरु आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या वादात मध्यस्थी करणार (HM Amit Shah to talk to CM`s of Maharashtra and Karnataka ) असून १४ डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासोबत अमित शाह एकत्र चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr Amol Kolhe)यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची अमित शाहांकडे तक्रार केल्यावर शहा यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून मध्यस्थीचा निर्णय घेतल्याचे कोल्हे यांनी सांगितले. या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी खासदारांकडून करण्यात आली होती. त्यासाठीच खासदारांनी शहा यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन्ही राज्यांमध्ये शांतता आणि कायदा-सुव्यवस्था असावी, यावर आमचे एकमत झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सलोख्याचे वातावरण राहणार असले तरी सीमाभागाबाबत आमची भूमिका तसूभरही बदललेली नाही. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात याबाबतची कायदेशीर लढाई लढू, असे बसवराज बोम्मई यांनी ट्विटमध्ये म्हटले. दरम्यान, बेळगावमध्ये घडलेल्या घटनांबाबत माझे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले आहे. अशा घटना घडविणाऱ्यांना सरकार पाठिशी घालणार नसल्याचे आश्वासन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी संपूर्ण स्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आपण सांगणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली.