
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा विज्ञान प्रदर्शनाला देणार भेट
नागपूर (Nagpur):- धरमपेठ एम. पी. देव स्मृती विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ विज्ञान महोत्सव व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ९ व १० जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. अंबाझरी तलावाजवळील धरमपेठ एम. पी. देव स्मृती विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हा उत्सव पार पडणार असून प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा आणि त्यांच्या वैज्ञानिक सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे या विज्ञान प्रदर्शनाला भेट देणार आहेत.
विज्ञान भारतीतर्फे सन २०१९ पासून हा विज्ञान उत्सव नियमित आयोजित केला जात असून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक कुतूहल, नवविचार आणि संशोधन वृत्तीला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रारंभी हा उत्सव केवळ नागपूर येथे आयोजित केला जात होता. मात्र नागपूरमध्ये होणाऱ्या उत्सवासाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, वर्ष २०२४ पासून हा उत्सव विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हास्तरावरील विजेत्यांसाठी नागपूर येथे अंतिम फेरी आयोजित केली जाते.
यावर्षी १३ डिसेंबरपासून विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये या विज्ञान उत्सवाच्या जिल्हास्तरीय फेऱ्या घेण्यात आल्या. आठवी ते अकरावी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा खुल्या होत्या. जिल्हास्तरीय स्पर्धांचा समारोप ३ जानेवारी २०२६ रोजी झाला. ‘क्लायमेट चेंज’, ‘वन हेल्थ’ आणि ‘डिफेन्स’ या तीन मुख्य संकल्पनांवर आधारित रांगोळी, पोस्टर, विज्ञान मॉडेल तसेच नाटिका सादरीकरणाच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
या उपक्रमातून विशेष बाब म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून अत्यंत आशयपूर्ण व प्रभावी विज्ञान नाटिका सादर करण्यात आल्या. एकूण सुमारे १०० नाटिका तयार झाल्या असून जवळपास ३,००० विद्यार्थ्यांनी या उत्सवात सहभाग घेतला. दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांमधूनही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. जिल्हास्तरावर विजेते व उपविजेते घोषित करून पारितोषिके देण्यात आली आहेत.
जिल्हास्तरावरील विजेते विद्यार्थी नागपूर येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी सहभागी होणार असून ही अंतिम फेरी ९ व १० जानेवारी रोजी धरमपेठ एम. पी. देव स्मृती विज्ञान महाविद्यालयात होणार आहे. या अंतिम फेरीत मॉडेल्स, रांगोळी, पोस्टर आणि नाटिका या सर्व प्रकारांचा समावेश असेल. यासोबतच नागपूर जिल्ह्यातील बी.एस्सी. व एम.एस्सी. विद्यार्थ्यांचे सुमारे ४० विज्ञान प्रकल्प या ठिकाणी प्रदर्शनासाठी मांडण्यात येणार आहेत.
विज्ञान भारतीचे पदाधिकारी तसेच धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे पदाधिकारी यांनी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विज्ञान उत्सव व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले आहे.



















