

नागपूर(Nagpur): नागपूर,ओसरी प्रॉडक्शन्सच्या वतीने “खाऊ गप्पा आणि कविता” हा अनोखा आणि बहुआयामी कार्यक्रम रविवार, 31 मे 2026 रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हील लाईन्स येथे सायंकाळी 6.45 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कवी, लेखक, अभिनेते प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर व निवेदक मुकुंद देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात पारंपरिक आणि सात्त्विक पदार्थांची चव, त्यामागील कथा, आयुर्वेदिक महत्त्व तसेच, जीवनातील अनुभव, किस्से आणि हास्यविनोदाने भरलेला संवाद यांचा समावेश असणार आहे. कार्यक्रमात मराठी कविता, स्वतः विष्णू मनोहर यांच्या रचना, त्यांनी तयार केलेले पदार्थ, हार्मोनियमच्या सुरात नटलेली भावगीते तसेच निवडक नाट्यप्रवेशांचे सादरीकरण यांद्वारे रसिकांना वेगळी सांस्कृतिक मेजवानी मिळेल. हार्मोनियमवर श्रीकांत पिसे तर तबल्यावर सचिन ढोमणे साथसंगत करतील.
या कार्यक्रमामध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीवर आधारित एक विशेष नांदी सादर करण्यात येणार असून ही नांदी प्रसिद्ध लेखक, कवी आणि गीतकार विघ्नेश जोशी यांनी तयार केली असून, नागपूरचे युवा गायक हिंडोल पेंडसे यांनी गायिलेली आहे.
हा कार्यक्रम नि:शुल्क असून प्रवेशिकांच्या आधारेच प्रवेश दिला जाईल. या कार्यक्रमाला महाचाय व
रोटरी क्लब एलिट यांचे सहकार्य लाभत आहे. रसिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



















