राहुल गांधांना सूचविले त्यात वावगे काय?

0

आशिष देशमुखांचे नोटीसीला उत्तर

नागपूर nagpur :  काँग्रेसमधून निबंबित करण्यात आलेले माजी आमदार आशिष देशमुख (Former MLA Ashish Deshmukh ) यांनी पक्षाने बजावलेल्या नोटीसीला उत्तर दिले आहे. भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५४% ओबीसी (OBC) आहेत, या वास्तवावर माझी ही सूचना आधारित आहे. काँग्रेस हा नेहमीच ओबीसींचा पाठिंबा मिळत आलेला पक्ष आहे. हा समाज दुखावला गेला असेल तर माफी मागण्यात गैर काय? मी राहुल गांधींना (Rahul Gandhi ) तसेच करण्यास सुचवले तर त्यात काय वावगे आहे? हा विषय संपवायला हवा असे मला वाटले आणि मी सूचना केली. पक्षाला बळकट करण्यासाठी ओबीसींना पुन्हा मोठ्या प्रमाणात काँग्रेससोबत आणले पाहिजे, असे रोखठोक मत मांडून देशमुख यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

देशमुख यांनी सडेतोड भाषेत उत्तर दिले आहे. राहुलजींच्या विधानाचा अर्थ असा लावला जात आहे की, जणू त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. आपण या अर्थाशी सहमत आहोत की नाही, हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे. माझी सूचना पक्षाच्या हिताची होती. मला एवढंच म्हणायचे होते की, ओबीसी समाजात काँग्रेसच्या विरोधात काही भावना असेल तर माफी मागून प्रकरण संपवले पाहिजे. “चौकीदार चोर हैं’ प्रकरणी राहुल यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली होती. राफेल प्रकरणातही त्यांनी मे 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली होती, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले आहे.

नोटीस बजावणे हा विनोद

काँग्रेस ‘लोकतांत्रिक पार्टी’ असल्याचा अभिमान बाळगणारा पक्ष आहे आणि त्याचे नेते लोकशाही पध्दतीने केलेल्या सूचनेसाठी कारणे दाखवा नोटीस बजावतात हा एक मोठा विनोद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही काँग्रेसचे असंख्य ओबीसी नेते आहेत. माझा प्रश्न असा आहे, की ते ओबीसींसाठी काय करत आहेत? ते समाजाची नाराजी कमी करण्यासाठी किंवा त्यांचा योग्य वाटा त्यांना देण्यासाठी काय करत आहेत? दुर्दैवाने काहीच नाही. पक्ष एका नाजूक टप्प्यातून जात असताना, ते अद्याप पक्षांतर्गत गटबाजीत आनंद मानत आहेत. ते घराणेशाही कार्यशैलीने काँग्रेसला कमकुवत करत आहेत. त्यांचे प्रदीर्घ मौन आणि निष्क्रियता त्यांच्या अधूनमधून येणाऱ्या वक्तव्यांपेक्षा आणि कारणे दाखवा नोटीससारख्या कृतींपेक्षा जास्त बोलकी आहे.

‘खोका’वर स्पष्टीकरणाची गरज नाही

एमपीसीसी अध्यक्षांशी संबंधित “खोका’ या माझ्या विधानाचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तथापि, त्याचा अर्थ काढण्याचे काम मी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांवर सोडतो. त्यांनी माझ्या सूचनेचा ज्याप्रमाणे अर्थ काढला, तसा ते या मुद्याचाही काढू शकतात. कारणे दाखवा नोटीस बजावण्यापेक्षा मी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना सल्ला देतो की, त्यांनी आपले मन, शब्द आणि कृती ओबीसींच्या हितासाठी वापरावी ज्यामुळे आपोआप पक्षाचे हित होईल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.