हगवणेंच्या वकिलाच्या कानशिलात हाणायची का आता?

0

Article

पुण्यातल्या गाजलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आता पोलीस आणि कोर्टाची कार्यवाही सुरू झाली आहे. एकूणच, हगवणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी, श्रीमंती, माज आणि समाजातले संबंध लक्षात घेता, हगवणे कुटुंबीयांना वाचवण्यासाठी अनेक लोक समोर येतील असे सुरुवातीपासूनच वाटत होते. वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी त्या संदर्भात अगदी सुरुवातीलाच संशय देखील व्यक्त केला होता. मात्र, त्यानंतर लगेच राजकीय क्षेत्रातील अजित पवारांपासून, तर इतर सर्व लोकांनी हात झटकून, आम्ही या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार नाही आणि ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत आपले म्हणणे स्पष्ट केले होते‌.

मात्र, त्यानंतरही हगवणे कुटुंबीयांना वाचवण्यासाठी त्यांचे संबंध, पैसा या सगळ्या गोष्टी काम करतीलच याबाबतचा संशय मागे उरलाच होता. त्याचा प्रत्यय काल त्यांच्या वकिलांच्या, कोर्टातील भूमिकेवरून आणि नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून आला. एकूणच, या कुटुंबाला वाचवण्यासाठी आता व्यवस्था आणि व्यवस्थेतले दलाल काम करू लागतील असे वाटू लागले आहे. हगवणे कुटुंबीयांच्या अतिहुशार वकिलाने न्यायालयात आपली वकिली पणास लावताना, समाजाच्या अपेक्षा, सामाजिक रचना, वैष्णवीच्या मृत्यूमागील इतिहास आणि पार्श्वभूमी या सगळ्यांना तिलांजली देत आपली अक्कल पाजळली आहे.

या कुटुंबाला वाचवण्यासाठी खालची पातळी गाठताना वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. तिचे कोणाशीतरी संबंध होते आणि त्या व्यक्तीने नकार दिल्यामुळेच वैष्णवीने आत्महत्या केली असावी, असे अकलेचे तारे तोडण्यापासून, तर कानाखाली आवाज काढणे किंवा प्लास्टिकच्या छडीने मारणे म्हणजे काही छळ नव्हे, असा अतर्क्य तर्क लावण्याचा शहाणपणाही या वकील साहेबांनी कोर्टात केलेला दिसतो आहे. नवऱ्याने बायकोला मारणे म्हणजे छळ नसणे आणि मारताना प्लास्टिकच्या छडीचा वापर केला असेल, तर त्याला शस्त्राच्या श्रेणीत गृहीत धरता येणार नाही, हा वकिलांनी केलेला अफलातून युक्तिवाद ऐकल्यावर आपण वकील नाही याचा अस्मादिकांना अत्यानंद झाला आहे.

आपल्या अशीलाला वाचवणे हे वकिलाचे परम कर्तव्य आहे. असते. हे मान्य केले, तरी इतक्या खालच्या स्तरावर जाऊन, एखाद्या सामाजिक परिणाम करणाऱ्या घटनेत असले अक्कल पाजळणारे युक्तिवाद, केवळ अशीलाकडून पैसे मोजायला मिळताहेत म्हणून वकिलांनी करणे सुरू केले असेल, तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या न्यायव्यवस्थेची दूरवस्था करण्यासाठी, ‘अशा’ वकिलांची मोठी संख्या अस्तित्वात असताना दुसऱ्या कोणाची गरजच काय, असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. मुळात नवऱ्याने बायकोला मारणे त्यातही पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये वैष्णवीच्या शरीरावर आढळलेल्या जखमा, यावर तीव्र आक्षेप घ्यायचे सोडून, जर या वकिलाला केवळ तगडी फी मिळाली म्हणून, त्याचे समर्थन करावेसे वाटत असेल आणि प्लास्टिकच्या छडीने मारणे हा गुन्हा नसल्याचा त्यांचा जावईशोध असेल, तर असले वकील निर्माण करणाऱ्या लॉ कॉलेजच्या शिकवण्याच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले पाहिजेत.

इथे कोणीच कोणाच्या बाबतीत वैयक्तिक पातळीवर जाऊ नये. पण, समजा असला दुर्दैवी प्रकार त्या वकिलांच्या कुटुंबातील मुली बाबत घडला असता, तर त्यांनी अशीच भूमिका घेतली असती का? या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे. इथे प्रश्न एका मुलीच्या मृत्यूचा आहे. हा मुद्दा हुंडाबळी सारख्या एका सामाजिक समस्येचा आहे. सवाल इथे एका कुटुंबाच्या राजकारणातून आलेल्या माजोरडेपणाचा आहे. आणि सवाल, एकूणच इथल्या समाजव्यवस्थेचाही आहे. अशा स्थितीत हगवणे कुटुंबाला वाचवायला निघालेल्या या हुशार वकिलाने त्यांना वाचवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न नक्की करावेत. शेवटी तो त्यांचा ‘धंदा’ आहे. त्यासाठी उकळायचा तेवढा पैसाही त्यांनी त्यांच्या अशीलाकडून उकळावा. पण केस जिंकण्यासाठी वैष्णवीच्या चारित्र्यावर हात घालण्याची वेळ येत आहे, म्हणजे हगवणेंची बाजू कमकुवत आहे, एवढे तर शेंबड्या पोरालाही कळते. म्हणूनच, या पातळीवर यावे लागणे ही धंद्यातील नामुष्की आणि वकिलीचा पराजयही आहे, एवढे मात्र त्यांनी ध्यानात ठेवावे.

प्रेम आणि युद्धात सगळे काही चालते, हे खरे असले आणि उद्या कदाचित असल्या क्लृप्त्या खेळून केस जिंकलीही, तरीही त्यांचे मन त्यांना माफ करणार नाही आपण चुकीच्या बाजूने लढलो, ही जाणीव त्यांना आयुष्यभर स्वस्थ बसू देणार नाही. शिवाय, समाजातून मिळणाऱ्या शिव्याशाप, यातून तर त्यांची सुटका अजिबात होणार नाही. कारण एकूणच, ज्या काही व्हिडिओ क्लिप्स आता हगवणे कुटुंबाच्या संदर्भात समोर येत आहेत आणि त्या कुटुंबातील सदस्यांची वागणूक चर्चेला येते आहे, तो सारा प्रकार बघितल्यानंतर त्यांच्या गुन्हेगार असण्याबाबत समाजाच्या मनात तरी शंका राहिलेली नाही. ठीक आहे! कोर्टाचे काम कोर्ट करेल आणि तिथे भावनांना थारा नसतो. तिथे पुराव्यानिशी बोलावे लागते. गुन्हा केला असणे किंवा नसणे हे सिद्ध करावे लागते. पण कोर्टाच्या स्तरावरचा निकाल या वकिलांच्या बाजूने लागला म्हणून समाजाच्या दृष्टीने काही त्यांची मलीन प्रतिमा सुधारणार नाही.

मुळातच आजच्या आधुनिक जगात एखादे कुटुंब इतक्या मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, वाहन, पैसा इतक्या गोष्टी लग्नाच्या निमित्ताने सुनेच्या माहेरातून स्वीकारते यातच हगवणे कुटुंबाची गुन्हेगारी सिद्ध होते. मुलीला झालेली मारहाण आणि तिने यापूर्वीही आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न, हा या कुटुंबाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर शिक्कामोर्तब करतो त्यामुळे वकिली डाव खेळून केस जिंकता आली, तरी लोकांची मनं जिंकता येत नाही, एवढे या वकील साहेबांनी लक्षात ठेवावे. आपण हगवणे कुटुंबाची बाजू मांडताना एका तरुण मुलीच्या मृत्यूची, समाजातील लग्नव्यवस्थेची आणि आता जराकुठे हुंड्याच्या विरोधात तयार होत असलेल्या, आपल्या समाजाच्या मानसिकतेचीही खिल्ली उडवतो आहे, ही बाब सुद्धा या वकिलांनी ध्यानात ठेवण्याची गरज आहे.

आणि आता राहिला प्रश्न कानाखाली आवाज काढणे हा गुन्हा नसल्याचा आणि प्लास्टिकच्या छडीने मारणे म्हणजे काही छळ नाही या मुद्द्याचा, तर या वकील साहेबांच्या समाधानासाठी, त्यांनाच मध्ये उभे करून एकदा एखाद्या चौकात, सार्वजनिक कार्यक्रम करूया! समाजातील लोक या वकील साहेबांना कानाखाली लगावतील आणि प्लास्टिकच्या छडीने त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वळ उमटतील. त्यानंतर कानाखाली आवाज काढणे म्हणजे गुन्हा नाही आणि प्लास्टिकची छडी म्हणजे काही शस्त्र नाही, हाच युक्तिवाद त्यांनी स्वतःच्या बचावासाठी कोर्टात करावा! म्हणजे आज ते जे काही बोलत आहेत, ते त्यावेळी लोकांनाही खरे वाटेल! वकील साहेब, नका हो हुंडाबळीचे समर्थन करू.

एका तरुण मुलीचा जीव घेणाऱ्या कुटुंबाचे समर्थन करण्यासाठी कुणाच्यातरी चारित्र्यावर शिंतोडे उडवणे सोपे असले, तरी ते योग्य नाही, एवढी नीतिमत्ता वकिली पेशात अजून शिल्लक आहे, याचे उदाहरण घालून देण्याची ही नामी संधी आहे. कारण, तुमच्या या केस मध्ये हगवणे कुटुंब जिंकले, तरी कोणालाच आनंद होणार नाही. पण लग्नानंतरच्या तीन वर्षातच तीन-तीन वेळा आत्महत्येचा प्रसंग गुदरलेल्या वैष्णवीचा पराजय मात्र लोकांच्या जिव्हारी लागणारा असेल. मनाच्या तारा तोडणारा असेल. वकील साहेब, तुम्हीच ठरवा, या केस मध्ये नेमकं काय होऊ द्यायचं आहे ते!