
बोराडी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सीमा तपासणी नाके बंद करण्याची घोषणा करत असतानाच, महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील हाडाखेड येथील आरटीओ चेक पोस्ट मात्र वाहनचालकांच्या आर्थिक लुबाडणुकीचे केंद्र बनले आहे. या चेक पोस्टवरून पुढे जायचे असेल, तर अधिकाऱ्यांना ‘मेवा’ दिल्याशिवाय साधा ट्रकही पास होत नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘पंटरांची फौज’ आणि कोट्यवधींचा महसूल बुडीत
येथील अधिकारी पैशांसाठी कितीही खाली उतरू शकतात, हेच या प्रकारातून दिसून येते. त्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे शासनाचा दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, तर अधिकारी मात्र गब्बर होत आहेत. या चेक पोस्टवर चक्क पंटरांची अख्खी फौज कार्यरत आहे. वाहनांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असली तरी, ती थांबवली जातात आणि कायद्याचा धाक दाखवून कारवाईची धमकी दिली जाते. शेवटी, पैसे दिल्यानंतरच वाहन पुढे जाऊ दिले जाते, असा स्पष्ट आरोप ट्रक चालक करत आहेत.
‘कुबेराचे द्वार’ ठरलेला दरवाजा आणि ‘टोकन पास’चा गोरखधंदा
प्रशासकीय इमारतीतील एका विशिष्ट दरवाजातून ही अवैध वसुली केली जात असल्याचे वाहनचालक सांगतात. या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनांना खास ‘टोकन स्वरूपाचा पास’ दिला जातो, हे तर आणखी धक्कादायक आहे. हा प्रकार रोज सुरू असून, त्यामुळे वाहनचालकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे.
*महागाईच्या माऱ्यात अवैध वसुलीचा दुहेरी फटका
आधीच इंधनाचे दर गगनाला भिडल्याने महागाईचा सामना करणाऱ्या ट्रक चालकांना, परिवहन विभागाच्या या अवैध वसुलीमुळे दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या पुरते मेटाकुटीला आले आहेत.
या गंभीर प्रकाराची राज्याचे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी तातडीने चौकशी करून ही अवैध वसुली थांबवावी, अशी जोरदार मागणी वाहनचालक करत आहेत. ‘एक खिडकी योजनेचे’ हे ‘कुबेराचे द्वार’ कधी बंद होणार, हाच खरा प्रश्न आता सर्वांना सतावतो आहे. यावर सरकार कधी लक्ष देणार?
बातम्यांसाठी संपर्क करा
लक्ष्मण गोपाळ : 9890710420