वनविभागाचा गावांत अलर्ट : ग्रामस्थांमध्ये दहशत
गोंदिया. जंगलालगतच्या गावांमध्ये धुमाकूळ घालत जंगली हत्तींच्या कळपाने गोंदियातील (Gondia ) काही गावांमध्ये कहर केला होता. याच कालावधीत हत्तींच्या कळपाने एका आदिवासी शेतकऱ्याला ठार केले होते. जवळपास १५ दिवस या परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर नांगलडोह (Nangaldoh ) येथील आदिवासींच्या वस्तीवर हल्ला करून त्यांच्या घराची व इतर जीवनोपयोगी साहित्याची नासधूस करत हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने वळला होता. त्यानंतर रानटी हत्ती दूर निघून गेले होते. आता मात्र पुन्हा हा कळप गोंदिया जिल्ह्यात दाखल झाल आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पळसगाव ते सर्रेगाव परिसरात गुराख्याला हत्तींचा कळप दिसला. त्यानंतर वन विभागाला माहिती दिली गेली. निरीक्षणांती जिल्ह्यातील सीमेवर कळपाचे लोकेशन दिसून आले. हत्तींचा कळप नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाकडे जाण्याची शक्यता वनविभागाकडून वर्तविण्यात आली आहे. वनविभागाने या मार्गावरील बसवोडन गावात अलर्ट जारी केला आहे. हत्तींच्या पुनरागमनाच्या वार्तेमुळे ग्रामस्थांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्मण झाले आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात पोहोचला होता. काही दिवस चांगलीच दहशत माजविल्यानंतर हत्तींनी मुक्काम हलविला होता. मात्र, गेल्या दोन ते चार दिवसांपूर्वी हे हत्ती पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील जंगलमार्गे गोंदिया जिल्ह्याच्या सीमेत दाखल झाले आहेत. २१ एप्रिल रोजी या हत्तींचे लोकेशन गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील पुराडा वनपरिक्षेत्र, रामगड बीटमध्ये दिसून आले होते. बुधवारी सायंकाळी हत्तींच्या कळपाने जिल्ह्याची सीमा ओलांडली असून सध्या ते पळसगाव व सर्रेगाव शिवारात असल्याची माहिती आहे. सावधगिरी म्हणून वनविभागाने नवेगाव बांध उद्यान आणि बसवोडन गावात अलर्ट जारी केला आहे. रानटी हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत त्यांचे लोकेशन पळसगाव व सर्रेगावच्या मध्यभागी असून नवेगावबांध उद्यानाच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बसवोडन ग्रामस्थांना दक्षतेचा इसारा देण्यात आला आहे. सध्याच कडक पहारा, बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु हत्तीच्या कळपाची हालचाल व धोका लक्षात घेऊन वनविभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पथकांसह सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.