अवकाळीने धोधो धुतले…!

0

यवतमाळमध्ये मोठी हानी : वर्धा जिल्ह्यातही थैमान

वर्धा. अवकाळी पावसाच्या (Unseasonal rain ) निमित्ताने अवघ्या विदर्भावरच आफत ओढविली आहे. बुधवारी रात्री अवकाळी पावसाने यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal district ) कहर केला. जिल्ह्यात सरासरी २४.२ मिमी पावसाची नोंद झाली असून पाच मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. या वादळी पावसात जिल्ह्यातील १५५ घरांची अंशत: पडझड झाली असून ४२ जनावरांचाही अवकाळीने बळी घेतला आहे. पावसामुळे भाजीपाला, कांदा, ज्वारीसह पपई आणि केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातही (Wardha district ) अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गुरुवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसात फळबागांना मोठा फटका बसला. देवळी तालुक्यात एक म्हैस तसेच समुद्रपूर तालुक्यात दोन बैल वीज पडल्याने मृत्युमुखी पडले. देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथील सुभाष गामे यांच्या घराचे टिनाचे छत उडून गेले. गोठ्यांचे नुकसान झाले.
मागील तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस होत आहे. बाभूळगाव, आर्णीसह अन्य तालुक्यात पावसाचा जोर होता. बाभूळगाव तालुक्यातील बाभूळगाव मंडळात अतिवृष्टी झाली असून येथे ७०.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आर्णी तालुक्यातील जवळा मंडळात ९२ मिमी पाऊस कोसळला आहे. केळापूर तालुक्यातील चालबर्डी मंडळात ६८ मिमी तर केळापूर मंडळात ६९.७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटंजी तालुक्यातील घोटी मंडळातही अतिवृष्टी झाली असून येथे ७१.२५ मिमी पाऊस कोसळला आहे.

गारपीट आणि वादळी पाऊस मुक्या जनावरांच्या जीवावर उठला आहे. बुधवारी झालेल्या पावसात लहान २३ आणि मोठे १९ अशा एकूण ४२ जनावरांचा मृत्यू झाला. तर १५५ घरांची अंशत: पडझड झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
वर्धा जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसात फळबागांना मोठा फटका बसला. देवळी तालुक्यात एक म्हैस तसेच समुद्रपूर तालुक्यात दोन बैल वीज पडल्याने मृत्युमुखी पडले. देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथील सुभाष गामे यांच्या घराचे टिनाचे छत उडून गेले. गोठ्यांचे नुकसान झाले. गावात लिंबाएवढ्या गारांचा खच पडला. गावकरी या प्रकोपने हादरून गेले आहेत. हिंगणघाट येथे सर्वाधिक ३५ मिमी पाऊस पडला, तर कानदगाव मंडळात ४९ मिमी अशी विक्रमी पर्जन्यमान झाले आहे. आष्टी, आर्वी, कारंजा येथील संत्रा तर सेलू तालुक्यात पपई बाग उद्ध्वस्त झाली आहे. आर्वी,सेलू,वर्धा येथील फुलशेतीचे पण मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.