WTC Final : ICC स्पर्धेत पुन्हा टीम इंडियाची निराशा,ऑस्ट्रेलिया बनली वर्ल्ड चॅम्पियन्स

0

लंडन, 11 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने फायनल सामन्यात भारताला 209 धावांनी पराभूत करून तब्बल दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोरल आहे. तर भारताची पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धा जिंकण्याच स्वप्न भंगल आहे.

लंडन येथील ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यावर सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले. सामन्याच्या पहिल्या दिवशी 7 जूनला भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानावर धुवाधार फलंदाजी करून तब्बल 469 धावांचा स्कोर उभा केला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शतक ठोकले. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने 4 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाच्या फलंदाजीच्या पहिल्या डावात टीम इंडियाने 269 धावा केल्या. यावेळी भारताकडून सर्वाधिक 89 धावा अजिंक्य रहाणेने केल्या, तर शार्दूल ठाकूरने 51 धावा करून अर्धशतक ठोकले. तर टीम इंडियाच्या इतर कोणत्याही फलंदाजाला संघासाठी चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमीन्सने 3 विकेट्स घेतल्या.