
नागपूर(Nagpur), 27 एप्रिल 2026: सुप्रसिद्ध लेखक व.पु. काळे यांच्या ‘वपुर्झा’मधील एक विचार आजच्या काळात अत्यंत चपखल बसतो— “खर्च झाल्याचे दुःख नसते, पण हिशेब लागला नाही की त्रास होतो.” हे विधान आपल्या दैनंदिन जीवनातील विजेच्या वापराबद्दलही तितकेच खरे आहे. 21 व्या शतकात वीज ही केवळ सुविधा न राहता अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याप्रमाणेच एक मूलभूत गरज बनली आहे. आज आपले घर, कार्यालय, शेती आणि उद्योग पूर्णपणे विजेवर चालणाऱ्या उपकरणांवर अवलंबून आहेत. मात्र, सोयीसुविधांसोबतच जेव्हा वीज बिलाचा आकडा वाढतो, तेव्हा त्याचे नेमके कारण शोधणे ही काळाची गरज बनली आहे.
वाढती उपकरणे आणि विजेचा वापर: आजचे युग तांत्रिक प्रगतीचे आहे. घरोघरी फ्रिज, ओव्हन, वॉशिंग मशीन आणि पाणी गरम करण्याच्या गिझरपासून ते अत्याधुनिक उपकरणांपर्यंतची यादी सतत वाढत आहे. साहजिकच उपकरणांची संख्या आणि त्यांचा वापर वाढला की वीज बिलात वाढ होणे निश्चित आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत तापमानाचा पारा वाढल्यामुळे पंखे, कुलर आणि एअर कंडिशनर्सचा (AC) वापर सातत्याने होतो. एप्रिल ते जूनच्या कडाक्याच्या उन्हात झालेला हा वापर जेव्हा वीज बिलात परावर्तित होतो, तेव्हा अनेक ग्राहकांना ते बिल ‘भरमसाठ’ वाटते. कधीकधी मानवी चूक किंवा तांत्रिक दोष असू शकतो, परंतु प्रत्येक वेळी हेच कारण नसते.
स्वतःच व्हा ‘विद्युत परीक्षक’ (Energy Auditor): आपल्याला येणारे वीज बिल योग्य आहे का, हे तपासणे आता अतिशय सोपे झाले आहे. घरातील प्रत्येक उपकरणाचा ‘वॅट’ (Watt) आणि त्याचा दिवसातील वापराचे तास यांची माहिती घेतल्यास आपण स्वतः विजेचे ऑडिट करू शकतो. बाजारात अशी अनेक अॅप्स आणि संकेतस्थळे उपलब्ध आहेत, जिथे उपकरणांची संख्या आणि वापराचे तास नोंदवल्यास तुम्हाला महिन्याचा अंदाजित युनिट वापर आणि बिलाची रक्कम तत्काळ समजते.
वीज बिलाची रचना समजून घ्या: आपल्या वीज बिलाच्या मागील बाजूला वीज दराची वर्गवारी दिलेली असते. यामध्ये 0 ते 100, 101 ते 300, 301 ते 500 आणि त्यापुढील वापरासाठी टप्प्याटप्प्याने वाढणारे दर (Slab Rates) नमूद असतात. तुमचा वापर जसा एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जातो, तसे प्रति युनिट दर वाढतात. म्हणूनच, 300 युनिटच्या पुढे वापर गेल्यास बिल अधिक वेगाने वाढल्याचे जाणवते.
ऊर्जा बचतीचे सुत्र: वीज बिल कमी करण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी नेहमी आयएसआय (ISI) प्रमाणित वायरिंगचाच वापर करावा. उपकरणे खरेदी करताना ‘स्टार लेबल’ असलेल्या उपकरणांना प्राधान्य द्यावे. उपकरणाला जितके जास्त स्टार, तितकी जास्त वीज बचत होते. एक साधे गणित लक्षात ठेवा— 1000 वॅटचे उपकरण जर सलग एक तास चालले, तर साधारणतः 1 युनिट वीज खर्च होते. हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून जर आपण उपकरणांचा वापर नियोजित केला, तर वीज बिलावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे. थोडक्यात सांगायचे तर, आपल्या वापराचा हिशेब आपल्याकडे असेल, तर बिल भरताना होणारा मानसिक त्रास नक्कीच कमी होईल. सजग राहा, विजेचा वापर जपून करा आणि स्वतःच्या वीज बिलाचे ‘स्मार्ट’ ऑ़डिटर बना!, असे आवाहन महावितरणने केले आहे.
आपणच आपले वीज बिल तपासा!
१ युनिट वीज वापर होण्यासाठी लागणारा वेळ
(१ युनिट = १००० वॅट १ तास)
उपकरण वीज वापर (वॅट्स) १ युनिट विजेसाठी लागणारा वेळ
बल्ब २५ / ४० / ६० / १०० ४० / २५ / १६ / १० तास
रात्रीचा दिवा १० / १५ १०० / ६६ तास १० मिनिटे
ट्यूब ४० / ३६ २५ / २७ तास ४७ मिनिटे
सी.एफ.एल. ११ / १५ / १८ / २२ ९१ / ६६ / ५५ / ४५ तास
पंखा (३६ इंची) ६० १६ तास ४० मिनिटे
पंखा (४२ इंची) ८० १२ तास ३० मिनिटे
टेबल फॅन ४० २५ तास
एअर कुलर २०० ५ तास
AC (१.०० टन) १५०० ४० मिनिटे
AC (१.५० टन) १८०० ३३ मिनिटे
मिक्सर / ज्युसर ४५० २ तास १३ मिनिटे
घरघंटी ७५० १ तास २० मिनिटे
इलेक्ट्रिक ओव्हन १२०० ५० मिनिटे
मायक्रोवेव्ह १८०० ३४ मिनिटे
इस्त्री (हलकी) ४५० २ तास १३ मिनिटे
इस्त्री (जड) ७५० १ तास २० मिनिटे
गीझर (इन्स्टंट) १००० ६० मिनिटे
गीझर (स्टोरेज) २००० ३० मिनिटे
टीव्ही १०० / २०० १० / ५ तास
रेडिओ / व्हीडिओ प्लेयर १५ ६६ तास ४० मिनिटे
वॉशिंग मशीन (हिटरसह) २००० ३० मिनिटे
वॉशिंग मशीन (हिटरशिवाय) ४०० २ तास ३० मिनिटे
व्हॅक्युम क्लिनर ९५० १ तास
संगणक (PC) २५० ४ तास
वॉटर प्युरिफायर २५ ४० तास
महत्त्वाच्या टिप्स:
• स्टार लेबल: नेहमी ३ ते ५ स्टार रेटिंग असलेली उपकरणे वापरा, यामुळे वीज बचत होते.
• ISI मार्क: केवळ प्रमाणित (ISI) तारा आणि विद्युत उपकरणांचाच वापर करा.
• गरज नसेल तर बंद करा: खोलीबाहेर पडताना दिवे आणि पंखे बंद करण्याची सवय लावा.
स्वतःच्या वीज वापराचे ऑडिट करा आणि भरमसाठ बिलापासून सुटका मिळवा!















