विदर्भातील खेड्यातील विद्यार्थी JEE मध्ये देशात प्रथम

0

नागपूर(Nagpur): JEE मुख्य परीक्षेचा दुसर्‍या सत्राचा निकाल एनटीएने जाहीर केला असून यात दोन मुलींसह ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश असून वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरचा शेतकरी कुटुंबातील व नागपुरात शिक्षण घेत असलेला निलकृष्ण निर्मलकुमार गजरे १०० टक्के गुणांसह गुणवत्ता यादीत देशात प्रथमस्थानी आहे. याशिवाय वैदर्भीय मोहम्मद सुफियान आणि देवांश गट्टानी यांनीही सुयश मिळविले आहे.
यावेळी जेईई मुख्य निकालात नागपूरच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. शहरातील १२ विद्यार्थ्यांनी पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये स्थान प्राप्त केले. यात मूळचा दर्यापूर येथील रहिवासी व ५ वर्षापासून नागपुरात शिक्षण घेत असलेला मोहम्मद सुफियान या विद्यार्थ्यांने १६ वी रँक प्राप्त केली. यासह देवांश गट्टानी या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के गुण प्राप्त करीत ऑल इंडिया ८२ वी रँक तर अक्षत खंडेलवाल या विद्यार्थ्याने ९० वी रँक प्राप्त केली.
निलकृष्णा हा बेलखेड, ता. मंगरूळपीर या छोट्याशा खेड्यातील शेतकरी निर्मलकुमार गजरे यांचा मुलगा आहे. दहावीपर्यंत कारंजा येथे शिकलेला निलकृष्णाने त्यानंतर शेगावच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. आयआयटी मुंबईचे ध्येय ठरविलेल्या निलकृष्णाने पुढच्या तयारीसाठी नागपूर गाठले व एका खाजगी शिकवणी वर्गातून अभ्यास केला. निलने जेईईच्या पहिल्या परीक्षेतही गुणवत्तापूर्ण यश प्राप्त केले.