अखेर ‘त्या’ 6 इंटर्नवर गुन्हा दाखल

0

मेडिकलमधील विद्यार्थ्याच्या रॅगिंगचे प्रकरण : निलंबित करून तातडीने वसतिगृह रिकामे करण्याचे अधिष्ठतांचे आदेश


नागपूर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (Government Medical College and Hospital) एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या रॅगिंगचे प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून या प्रकरणात कायदेशीरपद्धतीने पावले उचलली जात आहे. रॅगिंग घेतल्याचा आरोप असलेल्या सर्व सहा इंटर्न डॉक्टरांची सेवा थांबविली गेली होती. मात्र गुरुवारीच रॅगिंगची तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यानेच घुमजाव केल्याची चर्चा समोर आली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत होईल, अशी शक्यता निर्माण झाली असतानाच शुक्रवारी आरोपी सहाही इंटर्न डॉक्टरांविरुद्ध अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR against all six intern doctors in Ajani police station) नोंदविला गेला. गुन्हा दाखल होताच अधिष्ठातांनी या डॉक्टरांना निलंबित करीत तातडीने वसतिगृह रिकामे करण्याचे आदेश दिले. प्रशासनाची आक्रमकता लक्षात घेतल्यास तुर्त हे प्रकरण शांत होताना दिसत नाही.
ओम वैद्य, शिवप्रसाद कुंटे, श्रीगणेश निलवान, पियुष नेहारकर, सचिन भोसरे आणि शुभम भगत यांच्यावर रॅगिंग घेतल्याचा आरोप आहे. अखिल गिरडकर याच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी एप्रिल महिन्यात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे रॅगिंग केले होते. यानंतर विद्यार्थ्याने सेंट्रल अँटी रॅगिंग कमिटीकडे तक्रार केली. ही घटना 6-7 महिने जुनी असतानाही त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कमिटीने कठोर निर्णय घेतला. इतक्या दिवसांनी घडलेल्या घटनेची तक्रार करण्यात आल्यानंतरही त्यामागील कारण जाणून घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपींवर ठेवण्यात आलेले दोष योग्य आढळल्याने शुक्रवारी इंटर्नवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर अधिष्ठाता डॉ. रवी गजभिये यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या इंटर्न्सना निलंबित करून वसतिगृहातून तत्काळ बाहेर काढण्याचे आदेश जारी केले आहेत.
गुन्हा दाखल होताच डॉ. गजभिये यांनी शुक्रवारीच तडकाफडकी सर्व विभाग प्रमुखांसह निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी निवासी डॉक्टर, अधिव्याख्याते, सहयोगी प्राध्यापक यांचा रुग्णसेवेचा कालावधी आठ तासांच्या वर नसावा, विभाग प्रमुखांनी सर्व विद्यार्थ्यांशी नियमत संबाद साधावा. नवीन विद्यार्थ्यांवर कामाचा जास्त भार देऊ नय. गट तयार करून प्रत्येक गटाला एक पालक उपलब्ध करून त्यालाही विदयार्थ्याशी नियमित संवाद साधण्याच्या सूचना द्याव्या. कुठेही रॅगिंगसारखा प्रकार होऊ नये यासाठी विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांना समस्या विचारून वसतिगृहालाही भेट देण्याची सूचना त्यांनी केली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा