आज ग्रंथदिंडीने होणार नागपूर ग्रंथोत्सवाची सुरुवात

0

नागपूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणाअंतर्गत नागपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन 3 आणि 4 डिसेंबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवादरम्यान ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री अशा विविध कार्यक्रमांची मांदियाळी ग्रंथोत्सवात राहणार आहे. ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची सुरुवात होणार आहे.
उद्घाटन समारंभ 3 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने हे उपस्थित असतील. ज्येष्ठ साहित्यिक डॅा. वि.स.जोग या कार्यक्रमाचे उदघाटक असतील, तर अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. सुभाष आर. चौधरी हे असतील. प्रमुख अतिथी कादंबरीकार डॅा. भारती सुदामे असतील. यासोबतच जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती यावेळी असणार आहे.


उदघाटन समारंभापूर्वी सकाळी 8.45 वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवासदन शिक्षण संस्था प्रांगण ते दीक्षांत सभागृह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हा ग्रंथदिंडीचा मार्ग असणार आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी रविंद्र काटोलकर यांच्या हस्ते ग्रंथपूजन होणार आहे. सेवासदन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.समय बनसोड, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांचा प्रमुख सहभाग राहणार आहे. या
ग्रंथोत्सवाच्या उदघाटनानंतर 3 डिसेंबरला दुपारी 2.30 वाजता दृकश्राव्य माध्यमे आणि हरवलेले अक्षर साहित्य या विषयावर पहिल्या सत्रात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुस-या सत्रात दुपारी 4.15 वाजता मंजिरी देवरस यांचे कथाकथन होणार आहे. तिस-या सत्रात सायंकाळी 5 वाजता ग्रंथप्रेमी रंगले काव्यात या विषयावर कविसंमेलन होणार आहे.
रविवार 4 डिसेंबर रोजी पहिल्या सत्रात सकाळी 11 वाजता वाचन संस्कृती आणि ग्रंथालयाचे योगदान या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुस-या सत्रात व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळा होणार आहे. वत्सला पोलकमवार – आंबोणे यांच्या आत्मकथनाने तिस-या सत्राचा समारोप होणार आहे. समारोप कार्यक्रम सायंकाळी 5.15 वाजता होणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा