आमदार आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, काय घडले प्रकरण?

0

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात काल विनयभंगाचा (कलम ३५४ अंतर्गत) गुन्हा (Thane Police files molestation case against Jitendra Awhad) दाखल करण्यात आला आहे. काल कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याबाबत आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आता आमदार आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करीत आव्हाड यांनी आमदराकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून आव्हाड वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत त्यांनी या चित्रपटाचे काही शो बंद पाडले होते.

काय आहे तक्रार?

आव्हाड यांच्या विरोधात एका महिलेने तक्रार दिली होती. या महिलेच्या तक्रारीनुसार, एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाचा लोकार्पण कार्यक्रम रविवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. या लोकार्पण कार्यक्रमास आमदार आव्हाड उपस्थित होते. एक महिला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात असताना आव्हाड हे समोरून येत होते. यावेळी आव्हाड यांनी आपला विनयभंग करण्याच्या उद्देशाने आपले दोन्ही खांदे दाबून काय उभी आहे, बाजूला हो असे म्हणत ढकलले, असे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) ३५४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आव्हाडांच्या पत्नी काय म्हणतात?

आमदार आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी ट्वीटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे.पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी, “ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रिदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत,” असे ऋता यांनी म्हटले आहे. तसेच अन्य एका ट्वीटमध्ये, “राष्ट्रवादी व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या प्रकरणी हे गुन्हे रिदाविरोधात दाखल आहेत,” असेही ऋता यांनी सांगितले.“अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील,” असेही ऋता यांनी म्हटले आहे. आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी समर्थकांनी केला. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्धचा विनयभंगाचा आरोप चुकीचा व हेतुपुरस्सर असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे

मिंट पाईन ॲपल पुलाव आणि लाल भोपळ्याचे घारगे | Mint Pineapple Pulao Recipe | Epi. 32 |Shankhnaad News

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा