वन विभागाचे कर्मचाऱ्यांचे परिस्थितीवर लक्ष
केशोरी. गडचिरोली (Gadchiroli ) जिल्ह्यातून हत्तींच्या कळपाने बुधवारी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली (Umarpaili of Arjuni Morgaon taluk) परिसरात प्रवेश केला. त्यानंतर हा कळप शुक्रवारी देवरी तालुक्यातील चिचगड,चिमणटोला,पालांदूर या परिसरात दाखल झाला होता. दरम्यान या कळपाने रात्रीच्या सुमारास पुन्हा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जांभळी परिसरात शिरून धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Paddy crops were extensively damaged) केले. यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिनाभरापासून हत्तींच्या कळपाने गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा हत्तींचा कळप छत्तीसगड राज्यातून दाखल होता. पण ते अद्यापही परतीच्या मार्गाला लागले नसून त्यांचा मुक्काम गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील जंगल परिसरात आहे. दहा पंधरा दिवसांपूर्वी हा हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात परत गेला होता. पण ९ नोव्हेंबरला हा कळप परत जिल्ह्यात दाखल झाला आहे.
उमरपायली येथील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा देवरी तालुक्याच्या दिशेने वळविला. पालांदूर आणि चिमणटोला येथील शेतामध्ये हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून धानाचे पुंजणे आणि कापणी केलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर रात्रीच्या सुमारास हा कळप गोठणगाव, इटियाडोह परिसरातील जांभळी परिसरात दाखल झाला. या परिसरातील धान पिकांचे नुकसान केल्याची माहिती आहे. दरम्यान याची माहिती मिळताच वनविभागाची चमू या परिसरात दाखल झाली असून,हत्तींच्या कळपावर नजर ठेवून आहे. हत्तींचा कळप याच परिसरात असल्याने गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस घराबाहेर न पडण्याचे आवाहन वनविभागाने गावकऱ्यांना केले आहे.
सध्या जिल्ह्यात खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी सकाळपासूनच शेतात असतात. काही शेतकऱ्यांची धान कापणी पूर्ण झाली असून त्यांनी शेतात धानाचे पुंजणे तयार करून ठेवले आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या शेतात कापणी केलेला धान पडून आहे. हत्तींचा कळप धानाचे पुंजणे आणि कापणी केलेल्या धानाचे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे.
हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्यानंतर वन आणि वन्यजीव विभागाचे चमू अलर्ट झाले आहे. हत्तींचा कळप गोठगाव, जांभळी परिसरात दाखल झाल्यानंतर केशोरी,गोठणगाव, राजोली,तिखखुरी वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी या परिसरात दाखल झाले आहे.
हत्ती नियंत्रक पुन्हा दाखल
हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात पुन्हा धुमाकूळ घातल्यानंतर त्यांना नियंत्रणात करण्यासाठी पश्चिम बंगाल येथील आठ ते दहा जणांचे समावेश असलेले हत्ती नियंत्रक पथक या परिसरात दाखल झाल्याची माहिती आहे.