4000 चौरस फुटाची महारांगोळी संस्कार भारतीचा उपक्रम

0

नागपूर – उद्या सोमवारी अयोध्येत होणार्‍या श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त आयपीएएफ, उत्तिष्ठ भारत आणि सिद्धिविनायक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 21 जानेवारी रोजी बजाजनगर येथील बास्केटबॉल मैदानावर महारांगोळी साकारण्यात येणार आहे. संस्कार भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत घरोटे यांच्या मार्गदर्शनात हर्षल कावरे, मोहिनी माकोडे, दीपाली हरदास यांच्यासह एकूण 100 कलाकार यात सहभागी होणार आहेत. ही रांगोळी 50 बाय 80 फूट अशी एकूण 4 हजार चौरस फूट आकारातील असून संस्कार भारतीचे कलावंत ती दुपारी 3 ते रात्री 9 या 6 तासात पूर्ण करणार आहेत.
अध्यक्षस्थानी प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे,तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने तसेच श्री सिद्धीविनायक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी, इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हल (आय.पी.ए.एफ.) चे सीईओ श्याम पांडे उपस्थित राहणार आहेत.
ही महारांगोळी 22 आणि 23 जानेवारी असे दोन दिवस सर्व नागरिकांना बघण्याकरिता खुली राहणार आहे. यात अयोध्या मंदिराची प्रतिकृती, अक्षत कलश यात्रा, राम सीता, हनुमानजी, धनुष्यबाण, रामजी झुला, राम सेतूचा राम नावाचा दगड आदी प्रतिकृती बघायला मिळणार आहेत.