(Nagpur)नागपूर : उपराजधानी नागपुरात (gaming apps)गेमिंग अॅपच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला तब्बल ५८ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यामाध्यमातून आणखीही काही लोकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. फसवणूक झालेला व्यापारी व आरोपी या दोघांचे मैत्रीचे संबंध होते. ऑनलाइन गेमिंग अॅपला सशर्त परवानगी देण्यात आली असली तरी काही फसवणूक करणारे अॅपही सक्रीय असून त्यातून लोकांची फसवणूक होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील एक व्यापारी दीड वर्षांपूर्वी हे अॅप चालवणाऱ्या आरोपीच्या संपर्कात आला होता. या गेमिंग अॅपमधून कोट्यवधी रुपयांची कमाई होते असल्याचे आमिष त्याला दाखविण्यात आल्यावर त्याने अधिक पैशाच्या लोभापायी खेळायला सुरुवात केली. या अॅपमध्ये जिंकण्याचे सेटींग बदलण्यात आल्याने तो सतत पैसे हरत गेला. या सापळ्यात अडकत गेलेला व्यापारी तब्बल ५८ कोटी रुपये हरला. अखेर या व्यापाऱ्याने पोलिस तक्रार केली.
पोलिसांच्या चौकशीत हे अॅप (Gondia)गोंदिया येथील (Anant Navratan Jain)अनंत नवरतन जैन हा व्यक्ती नियंत्रित करत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याच्या गोंदियातील घरावर छापा टाकून १० कोटी रुपयांच्या अधिकची रक्कम जप्त केली. त्याच्या घरातून ४ किलो सोनेही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिस कारवाईची कुणकुण लागताच जैन (Dubai)दुबईला पळून गेल्याची माहिती आहे. या गेमच्या माध्यमातून विदेशातील लोकांनाही फसविले गेले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.