जिनोम सिक्वेंसिंगवर भर
नागपूर. कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘एक्सबीबी 1.16 चेही रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या विषाणूकडे दुर्लक्ष न करता बाधा झालेल्यांच्या घशातील द्रवाचा नमुना जिनोम सिक्वेंसिंगसाठी नीरी अथवा एम्सच्या प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येत आहेत. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत 265 वर नमुने पाठविले आहेत. त्यापैकी या दोन्ही संस्थांकडून 133 वर अहवाल प्राप्त झाले. यातील 70 नमुन्यांचे अहवाल हे ‘एक्सबीबी 1.16 पॉझिटिव्ह आले. यात नव्या व्हेरियंटची बाधा झालेले निम्म्याहून अधिक रुग्ण महापालिका हद्दीतील आहेत. दिलासादायी बाब म्हणजे कोरोनाच्या नव्या ‘एक्सबीबी. 1.16’चे संक्रमण झालेले सर्वच रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नव्या व्हेरियंटमुळे तर रुग्णसंख्या वाढत नाही ना? याची शहानिशा करण्यासाठी जास्तीत जास्त बाधितांचे जिनोम सिक्वेंसिंग होणे आवश्यक आहे. त्यामुळेच जिनोम सिक्वेंसिंगवर भर दिला जात आहे.
विषाणुंची ओळख पटविण्यासाठी विशिष्ट जनुकीय कोड असतो. विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत असताना ही जनुकीय संरचना सतत बदलत असते. काहीवेळा विषाणूचा व्यवहार बदलतो. तर, संसर्ग होण्याची क्षमता कमी-जास्त होते. विषाणूच्या संरचनेत मोठा बदल झाली नाही, तर काळजी करण्याचे कारण नसते. त्यामुळेच विषाणूच्या जनुकिय संरचनेत बदल झाला आहे का. हे शोधण्यासाठी जुना आणि नवीन दोन्ही विषाणूंना मॅच केले जाते. जिनोम सिक्वेंसिंगमध्ये बदल जास्त दिसून आला. तर, नवीन प्रकारचा ‘स्ट्रेन’ असल्याचं समजले जाते, असे तज्ज्ञ सांगतात. जिल्ह्यात ज्यापध्दतीने कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यासोबतच नवा व्हेरियंट असलेल्या ‘एक्सबीबी. 1.16’चे रुग्णही आढळून येत असल्याने महापालिका प्रशासनाकडून अधिकाधिक कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वें सिंगकरिता पाठविण्यावर भर देण्यात येत आहे. आजवर महापालिकेच्यावतीने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (नीरी) येथे जानेवारी ते 8 एप्रिलपर्यंत 265 वर नमुने जिनोम सिक्वेंसिंगकरिता पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी या दोन्ही संस्थांकडून 133 वर अहवाल प्राप्त झाले. यातील 70 नमुन्यांचे अहवाल हे ‘एक्सबीबी1.16 सकारात्मक आले.