मुंबईः ईव्हीएम वरून ठाकरे गट भाजपला सातत्याने लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मात्र ईव्हीएमचे समर्थन करीत संजय राऊतांच्या भूमिकेला छेद दिला. ईव्हीएम मशीनचा गैरवापर होत असेल तर दिल्ली, पंजाब, आंध्रप्रदेश, तेलंगना आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षाची सरकारे कशी आली? असा सवालच अजित पवार यांनी उपस्थित केला. (MP Sanjay Raut on Ajit Pawar statement on EVM) त्यावर नाराज झालेल्या संजय राऊत यांनी “अजितदादांची भाजपच्या अंधभक्तात गणना होऊ नये” या शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर केवळ भाजपच्या अंधभक्तांचा विश्वास आहे. देशातील जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नाही. अजित दादांची गणना भाजपच्या अंधभक्तात होऊ नये, अशी आशा असल्याचे खासदार राऊत म्हणाले आहे. त्यामुळे ठाकरे गट व अजित पवार यांच्यात या निमित्ताने वादाची ठिणगी पडली आहे.
अयोध्या दौऱ्यावर टोला
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांचा दौरा अयोध्या दर्शनापेक्षा शक्तीप्रदर्शनाचा जास्त होता. खरे तर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना अयोध्येस जाण्याची गरज नव्हती. ते ठाण्याच्या एखाद्या चौकातही शक्तिप्रदर्शन करू शकले असते. अयोध्येला जाताना एकनाथ शिंदे यांच्या विमानात गुंड, मवाली, खंडणीखोर बसले होते, अशी टीकाही त्यांनी केली.