
काँग्रेसच्या विभागीय बैठका जाहीर
मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप ठरत नसतानाच काँग्रेसने १८ जानेवारी पासून राज्यात विभागनिहाय बैठका घेण्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीत आपला वरचष्मा राखण्यासाठी काँग्रेसने विभाग निहाय बैठका घेण्याचे जाहीर केले असून या बैठकांची सुरुवात ही अमरावती विभागापासून सुरू होणार आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांवर यानिमित्ताने काँग्रेसची कुरघोडी सुरु असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर मिशन ४५ म्हणत महायुतीने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र अजून ठरले नाही. त्यातच आता काँग्रेसने विभागीय बैठकांना सुरुवात केली आहे. या बैठका सकाळी १० ते १ आणि दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होणार आहेत. १८ जानेवारी रोजी अमरावती येथे, २० जानेवारी रोजी नागपूर येथे, २३ जानेवारी रोजी पश्चिम महाराष्ट्रची बैठक पुणे येथे, कोकण विभागाची २४ जानेवारी रोजी भिवंडी येथे, २७ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक धुळे येथे तर २९ जानेवारी रोजी मराठवाडा विभागाची बैठक लातूर येथे होणार आहे. काँग्रेसने रमेश चेन्नीथला यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, चंद्रकांत हांडोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.