कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
नागपूर. येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही. जिल्ह्यांना त्यांच्या मागणीप्रणाणे या कृषी निविष्ठांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे, असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. वनामती येथे नागपूर विभागाचा खरीप हंगामपुर्व आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे उपस्थित होते. गेल्या काही दिवसातील अतीवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
हवामान खात्याच्या सुचनेनुसार यावर्षीचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी चांगला राहणार आहे. गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्यावेळी झालेल्या अतीवृष्टी, गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना 12 हजार कोटींचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीचे सहाय्य देणे बाकी असून पंचनामे अंतीम झाल्यानंतर ही रक्कम सुध्दा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
राज्यात जून पासून ते आतापर्यंत 46 लाख हेक्टरचे अतिवृष्टी व गारपिटीने नुकसान झाले आहे. 57 लाख शेतकरी यामुळे बाधीत झाले, असे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने एनडीआरएफने निश्चित केलेल्या दराच्या दुप्पटीने नुकसान भरपाई देण्याचे ठरविले आणि तशी भरपाई दिली सुध्दा.
केंद्र शासन शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेंतर्गत वर्षाला 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य देते. राज्य शासनाने देखील 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सन्मान योजनेच्या खात्याचे केवायसी करुन घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
शेतकरी शेती सोबतच पशुपालनाकडे वळल्यास त्यांचे आर्थिक उत्पन्न निश्चितच वाढेल, असे सांगून कृषी विभागातील सर्व पदे येत्या शंभर दिवसात भरण्यात येतील, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य भाव मिळावा यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.