मुंबई, 02 जुलै : महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते आज, रविवारी बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, विकासाला महत्त्व दिले पाहिजे असे माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचे मत आहे. गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने काम केले आणि विकास घडवला. ते पाहून आम्ही प्रभावित झालो. तसेच त्यांच्यासोबत काम कारावे असे आमचे मत बनले. देशाच्या राजकारणात आज सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊन नरेंद्र मोदींना विरोध केला आहे. त्यामुळे सरकारला बळकटी देण्यासाठी आम्ही मोदींसमवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच या सत्तेत, सरकारमध्ये सहभागी झालो आहे. यापुढील निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी आज राज्यातील शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आला आणि मी तो स्वीकारला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार होते. तर 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे. अजित पवारांच्या शपथविधीला नुकतीच पक्षाची मोठी जबाबदारी मिळालेले आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटलेही उपस्थित होते. त्यामुळे, आता शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.