मला चिंता नाही, आता जनतेत जाणार-शरद पवार

0

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आता त्यांना मंत्रिपदाची शपथ देऊन त्यांनी घोटाळ्यातून मुक्त केले, याचा मला आनंद असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यावर पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी राजकीय घटनाक्रमावर भाष्य केले. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर व विशेषतः तरुणांवर विश्वास असून मी जनतेत जाऊन संवाद साधणार आहे. उद्याच मी कऱ्हाडला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राज्याचा दौरा सुरु करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पवारांनी यावेळी स्पष्टच सांगितले.

पवार म्हणाले की, आमच्या सहकाऱ्यांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली. जो प्रकार घडला, त्याची मला अजिबात चिंता नाही. आजचा प्रकार माझ्यासाठी नवा नाही. 1980 साली मला अनेक जण सोडून गेले होते. तेव्हा मी पक्ष पुन्हा बांधला. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही, असे शरद पवार म्हणाले.आजचा दिवस संपला, उद्या सकाळी मी बाहेर काढून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मी काम करणार आहे. ही माझी भूमिका आहे. माझा राज्यातील जनतेवर विश्वास आहे. मी लोकांमध्ये जाणार असल्याचे पवार म्हणाले. या घटनाक्रमानंतर मला विरोधी पक्षातील अनेकांचे फोन आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले पवार-
-ईडीच्या कारवाईमुळे काही आमदार अस्वस्थ होते.
-मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांची अस्वस्थता वाढली होती.
-उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा झाली
-आम्ही न्यायालयात नाही, जनतेत जाणार.