
चंद्रपूर (Chandrapur) १४ एप्रिल :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या औचित्याने माजी पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पदयात्रा करत डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
भाजपच्या वतीने शहरातून भव्य वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला. रॅलीदरम्यान डॉ. आंबेडकरांचे विचार आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे घोषवाक्य, पोस्टर्स आणि झेंडे झळकत होते.
या प्रसंगी आमदार मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राला दिशा देणारी विचारांची ऊर्जा आहेत. त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी अभिवादनाची भावना आहे.”
शहरात अन्य ठिकाणीही विविध सामाजिक उपक्रम, व्याख्याने, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.