व्हॅलेंटाईनला ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे परिपत्रक मागे, पशु कल्याण मंडळाची माघार

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पशु कल्याण मंडळाने १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे ला ‘काऊ हग डे’
(गायीला मिठी मारण्याचं आवाहन) साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनावर मोठ्या प्रमाणावर टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंडळाने शुक्रवारी नवे पत्रक जारी करून आवाहन मागे घेतले आहे. मंडळाचा हा फतवा राजकीय टिकाटिप्पणी तसेच टिंगलटवाळीचा (Cow Hug Day ) विषय ठरला होता. महाराष्ट्रातही काही नेत्यांनी त्यावर टीका केली. व्हॅलेटाइन्स डे जगभर प्रेम करण्याऱ्यांसाठी आनंदाचा दिवस असतो. त्याच दिवशी भारतीय संस्कृतीचा दाखला देत पशु कल्याण मंडळाने गायीला मिठी मारण्याचे आवाहन केले होते. मात्र, भारतीय संस्कृतीत दिवाळीच्या दरम्यान गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसू बारस हा सण असताना ‘काऊ हग डे’ ची संकल्पना का काढण्यात आली, असा सवाल यासंदर्भात उपस्थित करण्यात आला होता.
या संकल्पनेला होणारा विरोध लक्षात घेऊन पशु कल्याण मंडळाने आज नवीन पत्रक जारी करत ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन मागे घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, ‘काऊ हग डे’ ला विरोध झाला असला तरी पाळीव प्राण्यांना मिठी मारण्याचे फायदे असल्याचे मत अनेक मनोचिकित्सकांनी व्यक्त केले असून यासंदर्भात अभ्यास देखील झाल्याचे सांगितले जाते. पाळीव प्राण्यांना मिठी मारल्याने तणाव कमी होतो, असा वैज्ञानिक निष्कर्ष काढला गेला आहे. भारतीय संस्कृतित गाय पवित्र मानली जाते. गाय शांत असते. त्यामुळे गायीला मिठी मारण्याचे फायदेच आहेत, असा दावा दिल्लीजवळील छतरपूर येथील ध्यान फाऊंडेशन आश्रमच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा