आणखी एका रुग्णाचा ‘एच ३ एन २’ने मृत्यू! -नागपूरकरांची चिंता वाढली

0

नागपूर – नागपुरात प्रशासन एकीकडे सी-20 पूर्वतयारीत गुंतले आहे. जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर असल्याने रुग्णसेवेला फटका बसला असताना आणखी एका 35 वर्षीय रुग्णाचा मृत्यू संशयास्पद H3N2 ने झाल्याचे आणि गेल्या महिनाभरात खासगी रुग्णालयात 5 रुग्ण असल्याचे चार जण सुखरूप घरी गेल्याचे पुढे आल्याने चिंता वाढली आहे. उपराजधानीत 74 वर्षीय बाधिताचा मृत्यू एन ३ एन २ ने झाला नसल्याचा निष्कर्ष मनपाच्या मृत्यू विश्लेषण समितीने काल काढला आहे. सहव्याधिंमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा समितीचा निष्कर्ष आहे. त्यातच आता एम्समध्ये एच ३ एन २ विषाणूने बाधित एका तरुण रुग्णाच्या मृत्यूने नागपूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. एम्समध्ये दगावलेल्या ३५ वर्षीय रुग्णाला हृदयाचा गंभीर आजार होता. १४ मार्चला मृत्यू झाला. मृत्यू विश्लेषण समिती हा मृत्यू कशाने यावर बैठकीत निर्णय घेणार आहे. दरम्यान, शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात ५ रुग्णाची नोंद झाल्याचेही सांगितले जात आहे. ही एका महिन्यातील आकडेवारी असल्याने चिंता आहे. वातावरणातील बदलामुळे आजार बळावण्याचा धोका असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

रुग्ण आढळण्यासोबतच, हा आजार गंभीर ठरू लागल्याने आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. सर्व रुग्णालयांना स्वाईन फ्लूसोबत या विषाणूच्याही चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रामदासपेठच्या खासगी रुग्णालयात महिन्याभरात या आजाराचे सुमारे ५ रुग्ण नोंदवले गेले आहे. हे सगळे गंभीर संवर्गातील रुग्ण आहेत. त्यापैकी चौघे बरे होऊन घरी गेले तर एकाचा मृत्यू झाला. चाचण्यांमुळे हा आजार उघड झाला असला तरी शहरभरात या आजाराचे लक्षण असलेल्यांच्या चाचण्या होत नाही. त्यामुळे या आजाराची नेमकी संख्या येत नसल्याचा वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे. दरम्यान, महापालिकेने या आजाराचे गांभीर्य बघता सर्वच रुग्णालयांना एच १ एन १ या स्वाईन फ्लूसोबतच एच ३ एन २ या चाचणीच्याही सूचना केल्या आहेत. सोबत प्रत्येक स्वाईन फ्लू व नवीन विषाणूग्रस्त रुग्णांची माहिती देण्याच्याही सूचना दिल्या आहे. दरम्यान, नवीन विषाणूची चाचणी खासगी प्रयोगशाळेत महाग आहे. त्यामुळे नातेवाईक चाचणीला तयार होत नाही. त्यामुळे चाचणीच्या मुद्यावर खासगी रुग्णालयात रुग्ण व रुग्णालय प्रशासनात वाद उद्भवण्याचीही शक्यता बळावली आहे.