Home Top News सावनेरमध्ये ‘डिफेन्स-न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉर’साठी 2721 हेक्टर भूसंपादनास मंजुरी

सावनेरमध्ये ‘डिफेन्स-न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉर’साठी 2721 हेक्टर भूसंपादनास मंजुरी

0
• आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी मानले मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार.
• आमदार डॉ आशिषराव देशमुख यांचे प्रकल्पासाठी संरक्षण मंत्र्यांना पत्र व सततच्या पाठपुराव्याला यश.

8 एप्रिलला मुंबई मंत्रालयात झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे प्रस्तावित डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस (DNA) कॉरिडॉर प्रकल्पासाठी लागणाऱ्या एमआयडीसी येथील भूसंपादनास मंजुरी दिली आहे. प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या 186 व्या भूसंपादन बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

प्रस्तावानुसार, सावनेर औद्योगिक क्षेत्र, ता. सावनेर, जि. नागपूर येथे सुमारे खाजगी 2601.2091 हेक्टर व सरकारी 120.74 हेक्टर मिळून एकूण 2721.9491 हेक्टर क्षेत्र (म्हणजेच 6725.98 एकर) संपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जमीन संपादनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 अंतर्गत प्रकरण 6 व कलम 2 (ग) मधील तरतुदी लागू करण्यात येणार आहेत.

सावनेर येथे प्रस्तावित या कॉरिडॉरच्या दृष्टीने भूसंपादनास मंजुरी, हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये एरोस्पेस (विमान, ड्रोन, उपग्रह भाग), डिफेन्स उत्पादन (शस्त्रे, मिसाइल, ॲम्युनिशन), न्यूक्लिअर संबंधित तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि प्रगत अभियांत्रिकी उद्योग विकसित करण्यात येणार असून, सावनेर हा भविष्यातील महत्त्वाचा औद्योगिक हब म्हणून विकसित होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भरता आणण्याकरिता ‘रक्षा कॉरिडॉर’ (डीएनए) देशामध्ये तयार केले जात आहे. उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉर, तामिळनाडू डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉर ही जिवंत उदाहरणे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारकडून प्रस्तावित ‘रक्षा कॉरिडॉर’ (डीएनए) मध्ये अमरावती, वर्धा, नागपूर आणि सावनेरचा समावेश करून संरक्षण मंत्र्यांना यासाठी प्रेझेंटेशन देऊन विनंती करण्यात आली होती.

दरम्यान, आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी हा प्रकल्प सावनेर येथे सुरू करावा, यासाठी सुरुवातीपासूनच सातत्याने प्रयत्न केले. यासाठी त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना 22 ऑगस्ट 2025 ला पत्राद्वारे डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस (डीएनए) या क्षेत्रात काम करणारे ‘रक्षा कॉरिडॉर’ (डीएनए) सावनेर येथे सुरू करण्याची मागणी देखील केली होती. सावनेरशी निगडीत आवश्यक मुद्दे त्यांनी पटवून सांगितले होते. या क्षेत्राला ‘संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर’ ही मोठ्या रोजगाराच्या दृष्टीने एक ऐतिहासिक संधी मिळावी, हा त्यामागील उद्देश. त्यानिमित्ताने सावनेर येथे 6725.98 एकर जमिनीवर ‘रक्षा कॉरिडोर’ (डीएनए) व्हावे, यासाठी एमआयडीसी येथे जागेची पाहणी देखील आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी केली होती. विशेष म्हणजे, त्यांनी केंद्राकडे व राज्य सरकारकडे वारंवार यशस्वी पाठपुरावा केला होता.

सावनेर येथे प्रस्तावित ‘डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉर’साठी लागणाऱ्या एमआयडीसी येथील भूसंपादनास मुंबई येथील बैठकीत राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीची मंजुरी मिळाल्यामुळे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी समाधान व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री *देवेंद्रजी फडणवीस* यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि पुढाकारामुळे या प्रस्तावित प्रकल्पाच्या कामाला गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. विदर्भाच्या दृष्टीने या प्रस्तावित प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होणार, स्थानिक युवकांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार, नागपूर व विदर्भाचा औद्योगिक विकास वेगाने होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

#सावनेर #डिफेन्सकॉरिडॉर #DNAकॉरिडॉर #नागपूर #विदर्भविकास #औद्योगिकविकास #भूसंपादन #MIDC #मेकइनइंडिया #आत्मनिर्भरभारत #रोजगारनिर्मिती #देवेंद्रफडणवीस #आशिषरावदेशमुख #महाराष्ट्रविकास #AerospaceIndia #DefenceIndustry #IndustrialGrowth