बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने जळगाव जामोद, संग्रामपूर हे तालुके खारपाणपट्टयात आहेत. त्या खालोखाल शेगाव आणि नांदुरा तालुक्यात देखील क्षारयुक्त पाणी असल्याने या तालुक्यातील अनेक नागरिकांचा किडनीच्या आजाराने मृत्यू होत आहे. त्यामुळे पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसिस कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यापूर्वी जळगाव जामोद , वरवट बकाल, शेगाव आणि मुख्यालय बुलढाणा येथे डायलेसिसचे केंद्र कार्यान्वित आहेत.
या केंद्रांमध्ये 277 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, किडनीच्या आजाराचे रुग्ण वाढल्याने डायलिसिस सेंटरची गरज पाहता पुन्हा मेहकर, चिखली, सिंदखेड राजा आणि मलकापूर या चार ठिकाणी डायलिसिस केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून सादर करण्यात आला होता. त्याला तांत्रिक मान्यता मिळाली असून प्रशासकीय मान्यता मिळताच या डायलिसिस केंद्राची निर्मिती होणार आहे. ज्याचा रुग्णांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती डॉ. भागवत भुसारी ,प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली