नवी दिल्ली : यंदाच्या मान्सूनबाबत वेगवेगळे अंदाज यापूर्वी वर्तविण्यात आले असताना स्कायमेटच्या अंदाजाने पुन्हा एकदा चिंता वाढल्या आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उशिराने अंदनामात मान्सूनचे आगमन होईल, असे अंदाज स्कायमेट या खासगी हवामान विषयक संस्थेने मांडले आहेत. चक्रीवादळ आणि बदललेल्या परिस्थितीमुळे २२ मेची तारीख हुकणार आहे. मान्सून सुरुवात कमकुवत असल्याचे स्कायमेटचे म्हणणे आहे. (Skymet Monsoon Forecast) स्कायमेटने आपल्या प्राथमिक अहवालात यंदा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. तर भारतीय हवामान खात्याने सामान्य मान्सूचे अंदाज मांडले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये साधारणत: 22 मे रोजी दाखल होत असतो. मात्र, यंदा त्याची सुरुवात कमकुवत असल्याचे दिसत आहे. भारतात सर्वप्रथम अंदमानात मान्सूनचे आगमन होत असते यंदा मान्सून अंदमानमध्ये विलंबाने दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटच्या वैज्ञानिकांनी मांडला आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र, नैऋत्य मान्सूनसंदर्भात आताच अंदाज वर्तविणे कठीण असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
लवकरच आयएमडीचे अंदाज येणार
भारतीय हवामान विभागाकडून (IMD) चालू किंवा पुढील आठवड्यात मान्सूनचा ताजा अहवाल अपेक्षित आहे.